जनावरे विकत घेण्याचा नावावर शेतकऱ्यांना गंडविणारा ठग अटकेत
नांदगांव पेठ पोलिसांची कार्यवाही

नांदगांव पेठ/ दि.१४ – शेतकऱ्यांची जनावरे विकत घेऊन त्यांना न वटणारे धनादेश देऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या ठगाला नांदगांव पेठ पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. स्थानिक एका शेतकऱ्याची बैलजोडी या ठगाने चोरून नेल्याने हे बिंग फुटले.रामराव भीमराव भोबडे रा.तिवसा असे त्या ठगाचे नाव असून पोलिसांनी त्याची कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपी रामराव भोबडे याने येथील शेतकरी चंद्रशेखर सुंदरकर यांच्या बैलजोडीचा ५५ हजार रुपयांमध्ये सौदा केला व पैसे आणून देतो म्हणून निघून गेला. शेतकरी चंद्रशेखर सुंदरकर हे शेतात गेले असता आरोपी रामराव भीमराव भोबडे याने गोठ्यातून बैलजोडी चोरून नेली.याप्रकरणी चंद्रशेखर सुंदरकर यांनी नांदगांव पेठ पोलीस स्टेशन येथे मंगळवारी सकाळी तक्रार दाखल केली असता पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी आरोपी रामराव भीमराव भोबडे याला तिवसा येथून ताब्यात घेऊन त्याची कोठडीत रवानगी केली.
भाजपाचे तालुका सचिव अमोल व्यवहारे यांनी याबाबत पुढाकार घेऊन परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी परिसरातील २५ ते ३० फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनवर धडक दिली.आरोपीने प्रत्येक शेतकऱ्यांकडून जनावरे विकत घेऊन त्यांना धनादेश दिले मात्र एकही धनादेश न वटल्याने असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक झाली.संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडला असुन संतप्त शेतकरी याविरोधात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन न्यायाची दाद मागणार आहेत. नांदगांव पेठ पोलिसांनी आरोपी विरोधात भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.





