अमरावती

कोरोना व्यक्तींचे अत्यंसंस्कार करताना खबरदारी बाळगावी

जिल्हाधिकाऱ्यांकडून हिंदू स्मशान भूमीची पाहणी

अमरावती, दि. १५ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतांना जाणीवपूर्वक सर्व खबरदारी बाळगावी. अंत्यसंस्कारच्या ठिकाणी मृत व्यक्तीला आणण्यासाठी स्वतंत्र प्रवेशव्दार व निकास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर, नातेवाईकांना उभे राहण्यासाठी शेड आदीसह कोरोना त्रिसुत्रीचे त्याठिकाणी काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हिंदू स्मशानभूमी संस्थेला दिले.
बुधवारी (ता.14) जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू स्मशान भूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची व परिसराची पाहणी केली. महापालीका आयुक्त प्रशांत रोडे, संस्थेचे अध्यक्ष आर. बी अटल यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाव्दारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत राज्यात तसेच जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे. या आदेशांचे नागरिकांनी उल्लंघन करु नये. आपला तसेच आपल्या कुटुंबियांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.
अमरावती शहरातील सर्वच भागातील मृतक व्यक्तींवर हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. आताची परिस्थिती पाहता कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांवरही हिंदू स्मशान भुमीतच गॅस दाहीनीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराची सुविधा केली आहे. पण हा विधी करत असतांना मृतकाच्या नातेवाईकांसह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी बाळगावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे सर्व उपाययोजना त्याठिकाणी तयार ठेवावी. मोजक्याच नातेवाईकांना प्रवेश द्यावा, असे निर्देश त्यांनी पाहणी प्रसंगी दिले.

Back to top button