अमरावतीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा

अभियानात होलीक्रॉस मराठी प्राथमिक शाळा तालुक्यातुन प्रथम

अमरावती/दि.11- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियानांतर्गत तालुका स्तरावर झालेल्या विविध स्पर्धेमध्ये होलीक्रॉस मराठी प्राथमिक शाळा,  कॅम्प अमरावतीने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मिनल यांनी दिली.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान सर्व राज्यभर दि. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात आले. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना वाढीस लागावी. स्पर्धात्मक वातावरणातुन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण व्हावे हा या अभियानाचा हेतु होय. या स्पर्धेअंतर्गत महावाचन महोत्सव, व्यावसायिक मार्गदर्शन, वर्गसजावट, वाचन कोपरा, बोलक्या भिंती, परसबाग, आरोग्य तपासणी, प्लॅस्टिकमुक्त पर्यावरण असे 30 उपक्रम राबविण्यात आले. या बाबींवर शाळांचे तालुका स्तरावर परीक्षण करण्यात आले. यामध्ये होलीक्रॉस मराठी प्राथमिक शाळा कॅम्प अमरावती शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मिनल यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे योगदानामुळेच शाळा तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

Related Articles

Back to top button