अमरावतीमराठी

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर समिती व कंट्रोलरूम

अमरावती, दि. 14 : कोरोनाच्या काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा व कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, नियमित समन्वयासाठी जिल्हास्तरावर कंट्रोलरूमही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आवश्यकता व त्यानुसार पुरेसा साठा यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षात कंट्रोल रुम स्थापण्यात आली आहे. याअनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचा-यांनी नियमित समन्वय करून ऑक्सिजनच्या अखंडित पुरवठ्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी शासनाकडून प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी पन्नास ड्युरा सिलेंडर आणि दोनशे जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांपैकी सरासरी किती रुग्णांना ऑक्सीजन बेड लागतात याचा विश्लेषणात्मक आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात त्यानुसार ऑक्सिजन बेड उपलब्ध असावेत याकरीता योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय, तसेच खासगी रूग्णालये, महानगरपालिका आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व रुग्णालयांची ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता संकलित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या, तसेच जिल्ह्यातील रूग्णालयांची आवश्यकता व यासंबंधीची स्थिती पाहून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  त्यानुसार अमरावती जिल्ह्यात स्थापित समितीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे,  अन्न व औषध प्रशासन सागर टेरकर व सागर घराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमणे, डॉ. विशाल काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, उद्योग अधिकारी उदय पुरी आदींचा समावेश आहे. ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याच प्रकारे समितीचे गठन करण्याबरोबरच, राज्यस्तरावर आरोग्य सेवा आयुक्त यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग आणि परिवहन अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोलरूम स्थापित

जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत पावसाळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुमकडे ऑक्सिजन पुरवठ्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.  ही कंट्रोल रूम ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहील.

अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रत्येक जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हावार नोडल अधिकारी नेमण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सर्व सार्वजनिक रुग्णालयांनी जिल्हा नियोजन व विकास परिषद किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा कार्पोरेट सामाजिक जबाबदारी मधून निधी प्राप्त करून क्रायो ऑक्सीजन टँक स्थापन करावेत असे शासनाचे निर्देश आहेत.

Related Articles

Back to top button