अमरावती, दि. 31 : खेळात हारजीत होतच असते. पण निराश न होता खेळत राहिले पाहिजे. खिलाडू वृत्ती कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे केले.रुरल इन्स्टिट्यूट येथे मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीसवितरण करताना ते बोलत होते. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, संस्थेचे अध्यक्ष गुड्डू ढोरे, संदीप देशमुख, क्रीडा प्रशिक्षक रोनी बिंदल, हेमंत देशमुख, संदीप सगणे, निलेश नाईक आदी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, प्रत्येक खेळात हारजीत होतच असते. पण निराश न होता खेळत राहिले पाहिजे. खिलाडू वृत्ती कायम ठेवली पाहिजे. चांगल्या खेळाडूला मनमोकळेपणे दाद देण्याचे उमदेपणही जोपासले पाहिजे. खेळाला जात, धर्म किंवा इतर कुठल्याही सीमा, प्रांत अशी बिरुदे किंवा कुठलेही रंग त्याला जोडता कामा नये. खेळाडूसाठी खेळ हाच धर्म असतो. मेरिटसोबत सद्सद्विवेकबुद्धी व विधायक विचारही जपले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.गत ९ वर्षांपासून सातत्याने स्पर्धा उत्तमरित्या आयोजित करून संस्थेने क्रीडा क्षेत्रात आदर्श निर्माण केला, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. क्रीडापटूंनी व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक असल्याचे श्री बिंदल यांनी सांगितले.