तिवस्यासह जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद
ग्रामीण भागात रस्ते व पुलाच्या कामांना मिळणार गती
अमरावती, दि. ११ : जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकाम आदी विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाद्वारे मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 33 कोटी रूपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक रस्ते व पुलाची कामे मार्गी लागून विकास गतिमान होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व तसे निवेदनही दिले. त्यानुसार शासनाकडून अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेतील. याबद्दल पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. खेड्यापाड्यांना जोडणा-या अनेक महत्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेची कामे याद्वारे होणार आहेत. रस्त्यांवरील आवश्यक पुलांचेही काम सुरू होणार आहे. यामुळे प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण होणार आहे. अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सुविधा निर्माण होईल. राज्याच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री एड. ठाकूर यांनी दिली. राज्य महामार्ग 303 बेलोरा काटसूर आडगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी 1 कोटी 20 लक्ष, पूर्णानगर निरूळ गंगामाई वाकी खोलापूर रस्त्यावर सुधारणा व पुलासाठी 3 कोटी, अडगाव यावली पिंपळविहिर मार्डी कार्ला ते चांदूर रेल्वे या राज्य महामार्ग 303 च्या सुधारणेसाठी दीड कोटी, अडगाव यावली मार्गे माऊली जहाँगीर रस्त्यासाठी 90 लक्ष, यावली डवरगाव मोझरी व-हा रस्त्याच्या सुधारणेसाठी साडेचार कोटी, मार्डी- कार्ला- चांदूर रेल्वे राज्य महामार्गच्या 303 च्या सुधारणेसाठी चार कोटी, तळवेल साऊर, तरारखेडा, आष्टी, वायगाव खारतळेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, विरशी वायगाव रस्ता सुधारणा व छोट्या पुलासाठी 2 कोटी, रिद्धपूर- बेलोरा- चिंचोली काळे – देवरी- कठोरा- नांदगावपेठ रस्त्याच्या सुधारणा व पुलासाठी 4 कोटी, तरारखेडा पुसदा रोहणखेडा माऊली जहाँगीर रस्ता सुधारणा व पुलासाठी 3 कोटी, उदखेड खोपडा शिरखेड रस्ता सुधारणेसाठी 3 कोटी 70 लाख, बहिरम सरफापूर फाटा चांदूर बाजार बेलोरा यावली चांदूर रेल्वे रस्त्यावर सुधारणा व लहान पुलासाठी 1 कोटी 71 लाख, नेर पिंगळाई आखतवाडा वाठोडा रस्ता सुधारणा व लहान पुलासाठी 1 कोटी 90 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.