अमरावतीमहाराष्ट्र

मृद व जलसंधारण पेपरफुटी प्रकरणातील मास्टर माईंड अटकेत

कर्नाटक मधून अभिषेक सावरीकरला अटक

गुन्हे शाखा युनिट क्र.२ची यशस्वी कार्यवाही

नांदगाव पेठ/दि.13- फेब्रुवारी रोजी ड्रीमलँड येथील ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्रावर महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचा अराजपत्रित अधिकारी पदाचा पेपर फुटल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.या प्रकरणात आजवर अकरा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी या प्रकरणातील फरार आणि मास्टर माईंड असलेला आरोपी कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथून ताब्यात घेण्यात आला. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या युनिट क्र.२ ने ही यशस्वी आणि धाडसी कार्यवाही केली.
अभिषेक अजय सावरीकर वय ३३ वर्ष रा. शिवाजी नगर, सिगनीचर टॉवर पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने गुन्हे शाखेने तेवढ्याच तत्परतेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिवस रात्र एक केली. वीस दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेचे एक पथक पुणे येथील अभिषेक सावरीकर याच्या घरी गेले होते मात्र आरोपी अभिषेक हाती लागला नाही.

गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करून तसेच आपल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे तांत्रिक व खात्रीलायक माहिती प्राप्त होताच बुधवारी कलबुर्गी येथून आरोपी अभिषेक सावरीकर याला कौशल्यपूर्णरित्या अटक केली.प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १२ झाली आहे.

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हेशाखा श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त परीमंडळ-१ कचे सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. गोरखनाथ जाधव (गुन्हे शाखा) अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, अनिकेत कासार, महेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, संग्राम भोजने, योगेश पवार, चेतन कराडे, संदिप खंडारे आदींनी ही ही कार्यवाही केली आहे.

सहा महिन्यांपूर्वीच अभिषेक तुरुंगातून बाहेर

मास्टर माईंड अभिषेक सावरीकर हा याआधी सुद्धा पेपरफुटीच्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात होता.सहा महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता हे विशेष!अभिषेक चे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी तसेच जेथून विभागाचे पेपर तयार होतात त्यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे सर्वश्रुत आहे.अटकेनंतर अभिषेक कडून आणखी महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे तसेच अनेक बडे मासे या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रशांत आवंदकरवर कुणाची मेहेरबानी?

मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवंदकर यांनी यश कावरे नामक विद्यार्थ्याला उत्तरे लिहून नक्कल पुरविली होती आणि त्यानंतर पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यभर धुमाकूळ घातला मात्र आद्यपही प्रशांत आवंदकर या प्रकरणाच्या चौकटीतुन बाहेर असून विद्यार्थी संघटनेच्या वतीने तर्कवितर्क लावण्यात येत आहे.प्रशांत आवंदकरवर नेमकी कुणाची मेहेरबानी आहे हे अद्याप न उलगडणारे कोडे आहे.

Related Articles

Back to top button