प्रशासकीय मान्यता देऊन कामे त्वरित सुरु करा
अचलपूर, चांदूरबाजार तालुका तसेच मेळघाटातील पाणीपुरवठा योजनांबाबत बैठक
अमरावती, दि. 31 : प्रत्येक गावाला पाणीपुरवठ्याची सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी मेळघाटसह सर्वदूर गावांमध्ये सुमारे साडेचारशे कोटी रूपये निधीतून कामे प्रस्तावित आहेत. या योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरु करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अचलपूर, चांदूर बाजार तालुका तसेच मेळघाट भागातील पाणीपुरवठा योजनांचा श्री. कडू यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, अधिक्षक अभियंता विवेक सोळंके, सहायक मुख्य अधिक्षक अभियंता गजानन दानवे, जल व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे, अचलपूर उपविभागाचे उप अभियंता सत्येन पाटील, चांदूरबाजारचे उपविभागीय अभियंता अजिंक्य वानखेडे, विशेष कार्य अधिकारी संजय कडू़, स्वीय सहायक जी.एस.धुर्वे आदी यावेळी उपस्थित होते.अचलपूर अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत कामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. 83 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अचलपूर व चांदूर बाजार या तालुक्यात या योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. बोरगांव दोरी, बोरगांव पेठ, बोरगांव तळणी, असदपूर, शहापूर येथील पुनर्वसन पाणीपुरवठा योजनांचाही राज्यमंत्र्यांनी घेतला.नवीन प्रस्तावित योजनेंतर्गत नव्याने जलजीवन मिशनमार्फत प्रस्तावित 19 गावे पाणीपुरवठा योजना तालुका चांदूरबाजार, 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका अचलपूर, गौलखेडा व 20 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदारा, बागलिंगा तसेच 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा आणि चांदूरबाजार शहराची वाढीव पाणीपुरवठा योजनांचा आढावा त्यांनी घेतला. प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन येथील कामे तातडीने सुरु करावी व कार्यवाहीचा अहवालही त्वरित सादर करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.
पाणीपुरवठ्यासाठी मोठी तरतूद
अमृत अभियानात अचलपूर पाणीपुरवठा योजना टप्पा-1 मध्ये साडेतेरा कोटी व टप्पा-2 मध्ये 10.36 कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. 83 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत अचलपूर व चांदूरबाजार या तालुक्यातील 86 गावे समाविष्ट असून या योजनेचा 148 कोटी 81 लक्ष खर्च अपेक्षित असून काही कामे पूर्ण झाली उर्वरित प्रगतीत आहेत. ही योजना डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होऊन ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळेल.बोरगाव दोरी, बोरगाव पेठ, बोरगाव तळणी व असदपूर, शहपूर या योजनेची अनुक्रमे किंमत रु. 1.22 कोटी, रु. 74 लक्ष, रु. 0.75 लक्ष व रु. 3.65 कोटी एवढी आहे. बोरगाव दोरी, बोरगाव पेठ, बोरगाव तळणी या योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून वीजपुरवठा घेऊन लवकरच योजना कार्यान्वित करण्यात येईल आणि असदपूर, शहापूर ही योजना मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित करण्यात येईल.
१५ दिवसांत प्रशासकीय मान्यता द्याव्यात
नवीन प्रस्तावित योजनेंतर्गत नव्याने जलजीवन मिशनमार्फत प्रस्तावित 19 गावे पाणीपुरवठा योजना किंमत रु. 20.32 कोटी या योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली. पुढील 15 दिवसात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.. तसेच 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका अचलपूर किंमत रु. 46.77 कोटी सदर योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करुन एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे आदेश त्यांनी दिले.मेळघाटमधील गौलखेडा व 20 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा किंमत 36.11 कोटी व बागलिंगा 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चिखलदरा किंमत रु. 18.58 कोटी या योजनेस तांत्रिक मान्यता आहे. प्रशासकीय मान्यता त्वरित देण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले.चांदूरबाजार शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना किंमत रु. 15.03 कोटी व 105 गावे पाणीपुरवठा योजना तालुका चांदूरबाजार किंमत रु. 158.00 कोटी या दोन्ही योजनेस तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून एका महिन्यात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
गुरूत्वावर आधारित सिंचन योजना
अचलपूर तालुक्यातील 24 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहे. अस्तित्वात असलेल्या योजनेचा स्त्रोत विंधन विहीरी व कुपनलिका आहे परंतु सिंचनासाठी कुपनलिकेव्दारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असून पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे भूजल स्त्रोताचे पाणी कमी पडत असून उन्हाळ्यात पाणीटंचाई सदृष्यस्थिती निर्माण होत आहे. या भागातील गावांची पाण्याची टंचाई लक्षात घेता या योजनेचा स्त्रोत सापन धरण घेऊन संपूर्ण योजना गुरुत्वावर आधारित प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतची पुढील कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी दिले. चिखलदरा तालुक्यातील बारलिंगा व 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कार्यक्रम जलजीवन मिशन कृती आराखड्यात समाविष्ट आहे. चिखलदरा तालुक्यातील गावे आदिवासी बहूल असून सातपुडा पायथ्याशी वसलेली आहेत. या गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून ही गावे डोंगराळ भागात असल्याने भूगर्भीय पाणी अपुरे पडत आहे. या भागातील गावांची पाण्याची टंचाई लक्षात घेता ही योजना राबविण्यात येत आहे. या सर्व कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.