अमरावतीविदर्भ

बालक व मातांच्या सुदृढ आरोग्य, पोषणासाठी निर्णय

अमृत आहार योजनेत दूध भुकटीचे वितरण होणार-पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 6 : मुले व स्तनदा मातांच्या सुदृढ आरोग्य व पोषणासाठी उपयुक्त असल्याने दूध भुकटीचे पॅकिंग करून अमृत आहार योजनेत मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात 25 हजारहून अधिक बालके व साडेपाच हजारहून अधिक मातांना त्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातही मेळघाटसह सर्वदूर वितरणासाठी परिपूर्ण नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

राज्यातील सहा लाख 51 हजार मुलांना आणि एक लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुध भुकटीत प्रथिनांचे प्रमाण 34 टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

दुध भुकटी मुलांना आणि मातांना पुरविण्याचे परिपूर्ण नियोजन करावे. मेळघाटसह जिल्ह्यात सर्वदूर योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यात अमृत आहार योजनेत सद्य:स्थितीत पंचवीस हजारहून अधिक बालके व साडेपाच हजारहून अधिक मातांचा समावेश आहे. त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दूध हा प्रथिनयुक्त आहार असल्याने तो या योजनेतून पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) प्रशांत थोरात यांनी दिली.

ही योजना पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 121 कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च 246 रुपये 70 पैसे इतका आहे. या कोविड काळात पोषणासाठी दूध भुकटी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाने लॉकडाऊन परिस्थितीत एप्रिल ते जुलै या कालावधीत राज्यात 5 कोटी 94 लाख 73 हजार 606 लिटर दुध शेतकऱ्यांकडून घेतले. तर ४९२७.७०२ मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन केले. तसेच २५७५. १७१ मेट्रिक टन बटरचेही उत्पादन केले आहे. ही भुकटी आणि बटर हे वखार महामंडळाच्या शीतगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे.

एकूण ७ दुध भुकटी प्रकल्पधारक आणि ३७ सहकारी संघ आणि ११ शासकीय दुध योजना या योजनेत आहेत. महानंदने ही योजना राबविली. दुधाचा खरेदी दर हा २२ रुपये १० पैसे ते २७ रुपये प्रती लिटर असा होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले.

कोविड काळात गर्भवती माता, स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) नियमित पद्धतीनुसार वितरीत करण्यात आला. 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार (हॉट कुक्ड मील- एचसीएम) दिला जातो. परंतु, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच एचसीएमऐवजी घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्यात आला. अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस चांगले काम करत असून, कोरोना संकटकाळात आरोग्यविषयक उपाययोजनांतही त्यांचे योगदान मिळत असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button