अमरावती

पांदणरस्त्यांच्या कामांचे नियोजन तत्काळ सादर करावे

जिल्हाधिका-यांकडून विविध महसूली कामांचा आढावा

अमरावती, दि.१५ : जिल्ह्यातील पालकमंत्री पांदण रस्ते योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आवश्यक तिथे सर्वदूर पांदणरस्त्यांची बांधणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक उपविभागातील अपेक्षित कामांची गरज लक्षात घेऊन या कामाचे नियोजन व प्रस्ताव तत्काळ सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी विविध तालुक्यांतील महसूलविषयक कामांचा आढावा उपविभागीय अधिका-यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, प्रियांका आंबेकर, संदीपकुमार अपार, नितीनकुमार हिंगोले, रणजीत भोसले यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पांदणरस्त्यांच्या अपेक्षित कामांचे नियोजन व प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. शेतकरी बांधव व सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी महाराजस्व अभियानाची परिपूर्ण अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार कार्यवाही करावी. एका महिन्यात सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढावेत.  पीएम किसान योजनेत प्रलंबित कार्यवाही पूर्ण करावी. रोजगार हमी योजनेत अधिकाधिक विकासकामे राबविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न व्हावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

Related Articles

Back to top button