अमरावतीमहाराष्ट्र

मौजे नवसारी येथे होणार सारथीचे अमरावती विभागीय मुख्यालय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय... निविदा प्रक्रियेला सुरुवात

आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी मानले उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार

अमरावती/दि.11– छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेच्या अमरावती विभागीय मुख्यालयासाठी मौजे नवसारी स्थित सर्वे नंबर २९ मधील १.४४ हेक्टर.आर. व सर्व्हे नं. १३३ क्षेत्र ०. ८१ हेक्टर आर जागा असे एकूण २.२५ हेक्टर आर जागा सारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयासाठी मंजूर करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर जागेवरील क्रीडांगणासह अन्य प्रयोजनार्थ प्रस्तावित आरक्षण रद्द करून येथे सारथीचे विभागीय मुख्यालय व वसतीगृह स्थापन करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून अमरावतीत सारथीचे विभागीय केंद्र सुरु होण्यासंदर्भात कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत सुद्धा निर्देशित करण्यात आले. याबद्दल अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना.अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

आर्थिकदृष्टया गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रोजगाराभिमुख प्रशिक्षण , महिला सक्षमीकरण आदींसाठी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथे सारथीचे विभागीय केंद्र सुरु करणे आवश्यक असल्याने मौजे नवसारी स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र मागील शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता. दरम्यान अजितदादा पवार यांनी अमरावतीत सारथीचे केंद्र घोषित करून याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या .

दरम्यान जिल्हा प्रशासनाने मौजे नवसारी स्थित सर्वे नंबर २९ मधील १.४४ हेक्टर.आर. व सर्व्हे नं. १३३ क्षेत्र ०. ८१ हेक्टर आर जागा असे एकूण २.२५ हेक्टर आर जागा यावर क्रीडांगणासह अन्य प्रयोजनार्थ प्रस्तावित आरक्षित असल्याने त्या जागेचे आरक्षण रद्द करून ती जागा सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय मुख्यालया करिता उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला. अशातच आज ११ मार्च रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सारथीचे अमरावती विभागीय केंद्रास मंजुरी प्रदान करण्यात आली. या अंतर्गत सारथीचे विभागीय कार्यालय, मुलामुलींचे वसतीगृह , वाचनालय , प्रशिक्षण मानव विकास केंद्र , आदींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भातील निविदा प्रक्रिया सुद्धा जलद पूर्ण करून कार्यवाही करण्याबाबत सुद्धा निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे आता अमरावतीत मौजे नवसारी येथील शासकीय जागेवर सारथीचे विभागीय केंद्र व वसतीगृह सुरु होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या बद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

गरजू मराठा तरुणांना विविध प्रशिक्षणाची सोय होईल- आ.सौ. सुलभाताई खोडके

गत काळात सारथीच्या अनेक योजना व प्रशिक्षणाला निधी अभावी अवकळा लागली असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन सारथी संस्थेला स्वायत्ता प्रदान केली आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होत असतांना अजितदादांनी अमरावती येथे सारथीचे विभागीय कार्यालय मंजूर केले आहे. यामुळे आर्थिकदृष्टया गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व रोजगाराभिमुख प्रशिक्षण ,निवासी कार्यशाळा आदींसाठी चांगली सोय उपलब्ध होणार आहे. सारथीचे केंद्र सुरु होण्याबाबत निविदा प्रकिया देखील राबविली जात आहे. यासाठी लागणाऱ्या निधीसाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नरत राहू.असा विश्वास आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button