अमरावतीमराठी

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून द्यावी-पालकमंत्री

शेतकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी शेतीला दिवसा वीजपुरवठा करा

 नांदगाव पेठ/दी. १७– नांदगावपेठ परिसरात शेतकरी बांधवांना पुन्हा बिबट्या आढळला असून, तातडीची शोधमोहिम राबवावी. बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून द्यावी, तसेच शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती येथे दिले.
      गत बुधवारी नांदगावपेठ येथील संगमेश्वर परिसरातील शेतात काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.  तथापि, कालही परिसरात आणखी एक बिबट्या आढळून आला आहे. नागरिकांची सुरक्षितता जोपासणे अत्यावश्यक असून त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी जलद मोहिम राबविण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी वन विभागाला दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी आज जिल्हा रूग्णालय येथे जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विवेक जयस्वाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली व  जखमींना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
     याप्रकरणी पालकमंत्र्यांनी वनविभाग व महावितरणची तातडीने स्वतंत्र बैठक घेतली. उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला व महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. महावितरणचे अभियंता श्री. गावंडे, बाळासाहेब देशमुख, हरीष मोरे, राजेश बोडखे, मुकुंद पांढरीकर, बाळासाहेब भुस्कडे, विनोद डांगे, मंगेश आवारे आदी यावेळी उपस्थित होते.परिसरातील शेतकरी-शेतमजूर आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
शेतीला दिवसा वीज पुरवठा करा
 परिसरात महावितरण विभागाने शेतीसाठी पुढील काही काळ दिवसा वीजपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिले. त्या म्हणाल्या की, परिसरात शेतीला वीज पुरवठा रात्रीच्या वेळी होतो. रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी-शेतमजूर बांधवांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला जावे लागते. परिसरातील वन्य प्राण्यांचा संचार पाहता ते अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे महावितरणने तत्काळ पुढील काही काळासाठी दिवसा वीज पुरवठा सुरु करावा व त्यानंतरही कायमस्वरूपी दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आदेश पालकमंत्र्यांनी महावितरण प्रशासनाला दिले

Related Articles

Back to top button