जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील 14 महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांना उच्चाधिकार समितीकडून मान्यता

– पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती/दि 15- जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 व जि. प. पाणीपुरवठा योजनेत 10 अशा 14 महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या कामांना उच्चाधिकार समितीकडून मान्यता देण्यात आली असून, लवकरच ही कामे वेग घेतील. जलजीवन मिशनअंतर्गत शासनाकडून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, अभियान स्वरूपात ही कामे पूर्ण करण्याचा निर्धार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना मंत्रालयात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रामीण पाणीपुरवठ्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्याचप्रमाणे, जिल्हास्तरावरही त्यांनी आढावा बैठका घेऊन गतीने कामे करण्याचे निर्देश दिले.जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत, वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेडोपाडी पाणीपुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे. आता प्रशासनानेही योजनेनुसार प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
‘मजिप्रा’च्या महत्वपूर्ण पाणीपुरवठा योजना
जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांमध्ये नांदगाव पेठ व ३२ गावे प्रा. पा.पु. यो. (ता. जि. अमरावती), 19 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता.चांदूरबाजार), तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पा.पु. यो. जि. अमरावती, १०५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,अमरावती आदी योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा १० योजनांना मान्यता
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांमध्ये जलजीवन मिशनमध्ये १० पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मान्यता मिळाली. त्यात मेळघाटातील कामांचाही समावेश आहे. साडेचार कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यात अमरावती तालुक्यातील मौजे काट आमला, नळ पा. पु. योजना, वरूड तालुक्यातील मौजे वडाळा नळ पा.पु. योजना व मौजे टेंभणी नळ पा.पु. योजना, चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तुळजापूर नळ पा. पु. योजना व मौ.बागापूर नळ पा.पु. योजना, भातकुली तालुक्यातील मौजे बहादरपुर नळ पा. पु. योजना, मौजे खल्लार नळ पा.पु. योजना, अचलपूर तालुक्यातील मौ. भोपापुर नळ पा.पु. योजना, चिखलदरा तालुक्यातील मौजे बगदरी नळ पा.पु. योजना, धारणी तालुक्यातील बबईढाणा नळ पा.पु. योजना यांचा समावेश आहे. जलजीवन अभियान हे ग्रामीण जनतेच्या जीवनात विशेषत: महिलांच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे आहे. त्यामुळे अपेक्षित पाणीपुरवठ्याची कामे पूर्णत्वास नेतानाच पाणी स्त्रोत विकास, पूरक पाणी स्त्रोतांची निर्मिती व बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार परिपूर्ण नियोजन व गावनिहाय आराखडे तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.