अमरावती

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे हाल

अंबिका हिंगमीरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

अमरावती/दि.३०- देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडालेला असून यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.८० रुपयांना मिळणाऱ्या पेट्रोलने शंभरी पार केली असून या दरवाढीविरोधात संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमीरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करीत त्वरित दरवाढ मागे घेऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आपल्या निवेदनातून केली आहे. कोरोना महामारीच्या आड सरकार अश्याप्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून एकप्रकारे सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील अंबिका हिंगमीरे यांनी केला आहे.
जिल्ह्यात चार महिन्यांपासून केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ केली असून याचा सर्वाधिक।फटका ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला बसत असून शेती व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नसतांना केवळ अधिक कर मिळविण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारला असल्याचे अंबिका हिंगमीरे यांचे म्हणणे आहे. देशात लॉकडाऊन सारखी गंभीर परिस्थिती असतांना जीवनावश्यक बाबींची दरवाढ हा केंद्राचा नाकर्तेपणा असून याविरोधात आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
एकीकडे कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात घालून कोणतेही नियोजन न करता केंद्र सरकार केवळ गोरगरीब लोकांची फसवणूक करीत असून आता आमचा संयम संपला पुढील आठवड्यापर्यंत पेट्रोल डिझेल सह अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर आपण केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरवून अहिंसकमार्गाने आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमीरे यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button