अमरावती/दि.२१– शनिवारपासून बेमुदत संपावर गेलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघाने आज आपल्या प्रलंबित मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यासाठी स्थानिक आमदारांना निवेदने देण्यात आली आहेत. यामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार देवेंद्र भूयार तसेच अन्य आमदारांचा समावेश आहे. संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात विद्यापीठ कर्मचारी संघ आंदोलन करित असून तो संप चौथ्या दिवशी देखील कायमच आहे.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर गेल्या वर्षभरापासून कुठलाही तोडगा काढण्यात येत नसल्याने कर्मचारी वर्गात राज्य शासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. अनेकदा कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर देखील केवळ आश्वासनांव्यतिरीक्त संघटनेच्या पदरात काहीही पडलेले नाही. राज्य शासन विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करित असल्याने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी धरणे आंदोलने तसेच लाक्षणिक उपोषण आंदोलन देखील करण्यात आले आहे. परंतू शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आफिसर्स फोरम, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन रजिस्ट्रार्स असोसीएशन, आयटक संलग्नित सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या एकत्रित कृती समितीने राज्यभरातील विद्यापीठ तसेच महाविद्यालयांमध्ये हे आंदोलन सुरू केले आहे. परंतू सरकारकडून कुठलाही तोडगा काढण्याची चिन्हे सध्या नसल्याने हे हा संप लाबण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे.
राज्य शासन आणि कर्मचारी वर्गात निर्माण झालेल्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तसेच शासन दरबारी कर्मचाऱ्यांचा आवाज पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कर्मचारी संघाने स्थानिक आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्या समस्यांबाबत आज अवगत केले आहे. यावेळी आमदार भूयार यांनी कर्मचारी संघाच्या समस्या समजून घेत त्यासंदर्भात मंत्री महोदयांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अजय देशमुख यांच्यासह मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.नितीन कोळी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशीकांत रोडे आदी उपस्थित होते.