अमरावती, दि.२० : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद असल्याने पोलीस, सैन्यभरतीसाठी सराव करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी आता विभागीय क्रीडा संकुलाप्रमाणेच शहरातील इतरही मैदाने खुली करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
याबाबत विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी क्रीडा विभाग व संबंधित संस्थांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी मैदाने खुली करून देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, डॉ. विशाखा सावजी, डॉ. अंजली ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलीस, सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. सरावासाठी त्यांना विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठी गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन इतरही मैदाने विद्यार्थ्यांना खुली करून देण्यात आली आहेत. सोशल डिस्टन्स व दक्षता नियम पाळून सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्यानुसार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय येथील मैदानांसह मालटेकडीवर सराव करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. क्रीडांगणाची नियमित सफाई व सोशल डिस्टन्स पाळून सरावाचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. ही मैदाने सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत खुली राहतील.