जि. प. प्रशासनाकडून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांच्या कामांचे होणार मूल्यमापन
मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी परिपूर्ण माहिती द्यावी

अमरावती, दि. 4 : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे मूल्यमापन व इतर माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. त्यामुळे मेळघाट क्षेत्रातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांनी परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमार्फत विविध योजनांची कामे, शासनाचे उपक्रम राबवताना स्वयंसेवी संस्थांची मदत होत असते. मेळघाटातील 305 गावांसाठी 321 स्वयंसेवी संस्था नोंदणीकृत आहेत, तथापि प्रत्यक्षात कार्यरत संस्थांची माहिती संकलित झालेली नाही. त्यामुळे अशा संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन जि. प. कडे नोंदणीकृत संस्थांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
मेळघाट क्षेत्रात काम करणा-या संस्थांनी आपले कार्यक्षेत्र, कार्य विषय, मागील पाच वर्षात केलेली कामगिरी आदी माहिती पत्ता आदी तपशीलासह द्यावी. जि. प. कडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांनीच ही माहिती द्यायची आहे. त्यानुसार संस्थांनी आपली माहिती धारणी व चिखलद-याच्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडे किंवा [email protected] , तसेच [email protected] किंवा[email protected] या ई-मेलवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





