मुंबईः कंगना रणाैतने मुंबईची पाकप्यात काश्मीरशी तुलना करून महाराष्ट्रातील राजकारण्यांचा संताप ओढावून घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनातसुद्धा आमदारांमध्ये कंगनाविरुद्धचा रोष प्रकर्षाने दिसून आला. यात काँग्रेस आणि शिवसेनेसोबत समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा कंगनाच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला केंद्राकडून मिळालेल्या वाय सुरक्षेचा निषेध केला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना वाय सुरक्षा दिली जाते, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्र केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे नाही, तर तमाम जनतेचे आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्याला अमली पदार्थ आणि बॉलिवूड कनेक्शन लागले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. कंगनाने काहींची नावे जाहीर करणार असल्याचे म्हटले. त्यावर काही कलाकार कंगनाचेसुद्धा नाव घेत आहेत. त्यामुळे, ड्रग्स आणि बॉलिवूड कनेक्शनचा तपास करत असताना कंगनाचे ड्रग्स कनेक्शन काय आहे, याचादेखील तपास व्हायला हवा, अशी मागणी विधानसभा परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केली.
बॉलिवूडमध्ये वंशवादवर बोलता बोलता कंगना इस्लामिक बॉलिवूडमध्ये डिइस्लामिक कल्चर आणत असल्याचे दावे करत आहे. म्हणजे, मुस्लिम किंवा अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती बॉलिवूडमध्ये काम करत असेल, तर त्या विरोधात मी आवाज उठवते आणि यामुळेच माझे जीव धोक्यात टाकले गेले असेही, ती सांगत आहे. असले लोक महाराष्ट्राचा अपमान करतात. त्यांना कुणीही सपोर्ट करू नये. अशांना महाराष्ट्रातून हकलून लावायला हवे, असे समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी म्हणाले.
कंगना भाजपचा पोपट!
कंगनाला वाय सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून मिळणाऱ्या धमक्या पाहता केंद्र सरकारने तिला वाय प्लस सुरक्षा दिली. याबद्दल तिने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मते, कंगना तर भाजपची पोपट आहे. तिला वाय सुरक्षा नको तर चक्क झेड प्लस सुरक्षाच द्या. कंगनासारखे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात, असा आरोप त्यांनी केला.
ठाकरे शैलीत सुनावले
मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणाऱ्या आणि मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या शैलीत सुनावले आहे. बाहेरुन आलेले काही जण महाराष्ट्राचे ऋण मानतात, काही जण मानत नाहीत, असे कंगनाचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहताना ते सभागृहात बोलत होते.