नवी दिल्ली/दि.१८– ज्या पद्धतीने आपण कोरोनाची लढाई लढत आहोत. त्याच पद्धतीने आपण आर्थिक लढाईदेखील लढत आहोत. यामुळेच सरकारने आर्थिक पॅकेज जारी केले आहे. आपण लवकरच कोरोना संकटातून बाहेर पडू. आपली निर्यात वाढेल आणि देशात कॅपिटल इन्व्हेस्टमेंटदेखील वाढेल. सरकार निर्यात वाढविण्यावर काम करत आहे. यामुळे देशात 5 कोटी नोकऱ्या तयार होतील. हेच आमचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे.
फेसबुक वादावर बोलताना गडकरी म्हणाले, राहुल गांधी हे देशाचे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी कोणत्याही रिपोर्टच्या हवाल्याने कुठलेही भाष्य करणे योग्य नाही. त्यांनी स्वत:च रिसर्च करायला हवा आणि यानंतरच त्यांनी सर्वांसमोर भाष्य करायला हवे.
नितिन गडकरी म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आपला तपास केला आहे. सीबीआयचाही तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आपण यावर काहीही बोलणे योग्य नाही. रिपोर्ट आल्याशिवाय आपण यावर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही.-
कोरोना संकटावर बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले, कोरोना लढाईच्या काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. उद्योग क्षेत्र, परिवहन आदींचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे वैश्विक संकट आहे. आपण लवकरच यातून बाहेर पडू आणि आपल्याला कोरोनाची लस मिळेल, असेही गडकरी म्हणाले.