देश दुनिया

पुढच्या महिन्यात राहुल काँग्रेसचे अध्यक्ष?

नवी दिल्ली दि १८ – नेतृत्वाच्या संकटांशी झगडत असलेल्या काँग्रेसला पुन्हा राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य पर्याय सापडत नाही. पक्षाची धुरा पुन्हा एकदा राहुल यांच्याकडे सोपविली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे अधिवेशन बोलवले जाऊ शकते. हे अधिवेशन नीमराणा किंवा जैसलमेरमध्ये होईल. तिथेच पक्षाची कमान राहुल यांच्याकडे सोपविली जाण्याची शययता आहे.
राहुल गांधी 16 डिसेंबर 2017 ते 10 ऑगस्ट 2019 पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्या वेळी राहुल यांना पक्षाच्या नेत्यांनी राजी करूनही त्यांनी पक्षाध्यक्ष राहण्यास नकार दिला. तेव्हापासून हंगामी अध्यक्ष सोनिया याच जबाबदारी सांभाळत आहेत. पण त्यांना मर्यादा आहेत. गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष शोधण्यात काँग्रेसला यश आले नाही. अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. वारंवार होणार्‍या पराभवाचे चिंतन होत नाही, तसेच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याने पक्ष सैरभैर झाला आहे. आता सोनिया गांधी यांची मंजुरी मिळताच अधिवेशन बोलावण्यात येईल. काँग्रेस निवडणूक समितीने सोनिया यांना अधिवेशन बोलण्यासाठी वेळ व ठिकाण निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांची यादी अंतिम करण्याचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. सोनिया यांच्या मंजुरीनंतर लवकरच काँग्रेस अधिवेशनाचे ठिकाण व वेळ निश्चित होईल.
दोन महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या कामकाज पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ठेवले. ते म्हणाले होते, की पंचतारांकित संस्कृतीने निवडणुका जिंकता येत नाहीत. ही संस्कृती सोडल्याशिवाय कोणतीही निवडणूक जिंकता येणार नाही. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळविता आलेले नाही. काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या 23 नेत्यांनी सोनिया यांना या विषयावर पत्र लिहिले होते. यामध्ये कपिल सिब्बल यांच्यासह आझाद यांचा समावेश होता. पक्षात वरून खालपर्यंत बदल करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती. पक्षात पूर्णवेळ सक्रिय नेतृत्वाची मागणी केली गेली. काँग्रेसच्या एका गटाचा राहुल यांच्याकडे नेतृत्व द्यायला विरोध आहे. राहुल यांनी पत्रकर्त्या नेत्यांचा उेख भाजपशी संगनमत असलेले केल्यामुळे वाद झाला होता. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर सिब्बल यांनी असे म्हटले होते, की प्रत्येक निवडणुकीत पक्षाने नशीब म्हणून पराभव स्वीकारला असेल. त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याचे मानले जात होते. या पार्डभूमीवर अधिवेशनात पुन्हा राहुल यांच्याच गळ्यात पक्षाध्यक्षाची माळ पडणार असून त्यांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे.

Related Articles

Back to top button