पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन
कार्डिओ अँब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने

पुणे २ सप्टेंबर : कार्डिओ अँब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. या घटनेमुळं आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आला असून चहूकडून सरकारवर टीका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.
रायकर हे टीव्ही 9 या वृत्तवाहिनीत कार्यरत होते. कोरोनाकाळात ते सातत्यानं फिल्डवर होते. याच काळात त्यांना संसर्ग झाला होता. प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर 28 ऑगस्ट रोजी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. रविवार, 30 ऑगस्ट रोजी रात्री पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल •रण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू होते.
मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली होती. त्यामुळं त्यांना इतरत्र हलवण्यासाठी कार्डिओ अँब्युलन्सची गरज होती. जी अँब्युलन्स मिळाली त्यातील व्हेंटिलेटर खराब होते, तर दुसऱ्या एक अँब्युलन्समध्ये डॉक्टरच उपलब्ध नव्हते. हे सगळ्या गोंधळामुळं उशीर होत गेला आणि पांडुरंग यांची प्रकृती जास्तच खालावत गेली. शेवटी अँब्युलन्स मिळाली खरी पण तोपर्यंत उशीर झाला होता





