कोरोना चाचणी अहवाल संबंधितांना तत्काळ कळण्यासाठी हेल्पलाईन सुरू
जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 4 : कोरोना चाचणी अहवाल संबंधितांना तत्काळ कळावेत व उपचारांना गती यावी यासाठी कोविड हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘कोविड-19 मॉलेक्युलर डायग्नोस्टिक लॅब’कडून आरोग्य यंत्रणेला वेळेत अहवाल मिळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्याचा युझर आयडी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे लॅबकडे चाचणीच्या निष्कर्षाची नोंद झाल्यावर तत्काळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांना ऑनलाईन माहिती कळणार आहे. त्यामुळे रूग्णांना माहिती कळवणे, उपचार आदी कामे ही दोन्ही कार्यालये गतीने करू शकणार आहेत.
त्याचप्रमाणे, कोरोना चाचणी अहवालाची माहिती संबंधितांना कळण्यासाठी कोविड हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे. त्यावरून संबंधित व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष कळू शकणार आहेत. संबंधितांना कोविड हेल्पलाईनच्या 8408816166 या क्रमांकावर किंवा कोविड कॉल सेंटरच्या 8856997215 क्रमांकावर दूरध्वनीद्वारे माहिती मिळू शकेल. संबंधित व्यक्तींनी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत या हेल्पलाईनद्वारे आपल्या अहवालाबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





