
मुंबई/दि.१९ – देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न उणे असले, तरी उद्योगपतींचा उत्साह शिखरावर आहे. केंद्र सरकारच्या आकड्यांनुसार, जुलै ते ऑक्टोबरपर्यंत दर महिन्याला 16 हजारांपेक्षा जास्त कंपन्या स्थापन झाल्या. यापूर्वी कधीही एका महिन्यात 14 हजारपेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झाली नव्हती. ऑक्टोबरमध्ये 16,607 कंपन्या स्थापन झाल्या, हा विक्रम आहे. विशेष म्हणजे नव्या कंपन्यांत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा जास्त आहे.
सध्या देशात बिझनेस सर्व्हिस क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा 32 टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगचा 20 टक्के आहे; पण नव्या कंपन्यांत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा 22 ते 23 आहे, तर बिझनेस सर्व्हिस क्षेत्राचा वाटा घटून 28 ते 29 टक्क्यांवर आला आहे. 2014 मध्ये हे प्रमाण 40 : 15 असे होते. कंपनी व्यवहारातील तज्ज्ञ निपुण सिंघवी म्हणाले, की नव्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना फक्त 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्स लागत आहे. त्यामुळे इतर कंपन्यांमार्फत व्यवसाय करणारे लोकही कंपनी स्थापन करून व्यवसाय करू इच्छितात. पीएलआय योजनेचा परिणामही दिसत आहे.
पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ डॉ. एस. पी. शर्मा यांनी सांगितले, की सरकार नव्या सुधारणा करत आहे, त्यापैकी बहुतांश नवे उद्योग आणि एमएमएमईसाठी आहेत. त्यामुळे ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, ते कंपन्यांची नोंदणी करत आहेत. कंपन्यांची नोंदणी करणार्यांत विदेशातून परतलेले लोकही आहेत, कारण येथे व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत.
.