मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी करणार सोलापुरचा दौरा
मुंबई/दि.१७– राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दरम्यान, त्याआधी विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री सोमवारी दौऱ्यावर येत आहेत.
गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.