महाराष्ट्र

कोरोना सेंटर मध्ये महिला रूग्ण सुरक्षित नाहीत

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ नी दिली माहिती

मुंबई/दि.११– कल्याण डोंबिवलीप्रमाणेच राज्यतील कोरोना सेंटरमध्ये महिला रुग्ण सुरक्षित नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याने राज्य शासनाच्या मुख्य अजेंड्यावर महिला सुरक्षा हा मुद्दा आहे की नाही हा मुख्य सवाल आहे.  कल्याण-डोंबिवलीतील कोरोना सेंटरमध्ये देखील सीसीटीवी कॅमेरे नाहीत, महिला सुरक्षा रक्षक नाहीत ही शोकांतिका असून ते योग्य नाही, असे मत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. डोंबिवलीतील पाथरली नजीकच्या कोविड सेंटरला आणि कल्याणमधील केंद्रांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी महिला रुग्णांच्या सुविधा नसल्याने महिला असुरक्षित असून राज्य शासनाने त्यासंदर्भात वेळीच लक्ष घालावे, असे त्या म्हणाल्या.  वसई विरारमध्ये देखील अशीच अवस्था असून त्यात तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. केवळ कोविड सेंटर पुरता महिला सुरक्षा हा प्रश्न मर्यादित नसून चार महिन्याचा आढावा घेतला असता ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत, ते अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले असून राज्य शासन नेमकं महिलांसाठी करतय तरी काय? छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा हा महाराष्ट्र आहे का? गृहमंत्री, मुख्यमंत्री यासारख्या गंभीर विषयावर गप्प का आहेत? असे सवाल वाघ यांनी केले.
आगामी आठवडाभरात त्या कोविड सेंटरच्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपाचे नगरसेवक हे मनपा आयुक्त विजय सुर्यवंशी याना भेटतील. जर त्या समस्या सुटल्या नाहीतर मात्र रस्त्यावर उतरून महिलांसाठी न्याय मागावा लागेल, त्याची आम्हाला सवय आहे हे देखील शासनाने लक्षात घ्यावे असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Back to top button