औरंगाबाद/दि 11-मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्यादिशेनं निघाली होती. दरम्यान या भव्य रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मुंबईत रॅली सभांना बंदी असल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांना मुंबई बाहेर रोखण्यासाठी पोलीसांनी मुंबईच्या वेशीवर बॅरिकेडींग केलं होतं. पण अखे खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह वाहनांचा ताफा घेऊन वाशीच्या पुढे मानखुर्दपर्यंत पोहोचले आहेत. काही वेळातच सर्व ताफा चांदिवलीत दाखल होणार आहे. त्यामुळे आज (शनिवारी) सायंकाळी चांदीवली येथील एमआयएमची सभा होणारचं असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला आहे.
रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक -खासदार इम्तियाज जलील
रॅलीबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचंही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले. रॅलीला परवानगी घेतलेली आहे. त्यानंतर यावर निर्बंधाबाबत आमच्याकडे काहीही अधिकृत पत्र आलेलं नाही, असं जलील म्हणाले.