मुंबई /दी12- विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलाय. भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. आताचं सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते. ओबीसींना आवाज आणि नेता मुंडे यांनी दिला. मोदींनी नेहमी गरीबाचा विचार केला. 2011 मध्ये आपण पोट माळ्याचा निर्णय घेतला. हे नविन सरकार नुसते घोषणा करतं. गोपाळ शेट्टी यांनी सरकारविरोधात लढा चालू केला तो आपण जिंकू. आताचं सरकार नवीन काही करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचं काम पूर्ण झालं असतं. त्यांना एक रेघही पुढे ओढता येत नाही. ते जमत नसेल तर आम्ही सुरु केलेली कामं थांबवू नका. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या, त्यावेळी भाजपचा कार्यकर्ता थांबला नाही, तो रस्त्यावर मदत करत होता, असं फडणवीस म्हणाले.
‘म्हाडा’ पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा, फडणवीस आक्रमक
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय.
‘मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे, हे चालणार नाही’
‘परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.