मराठी

‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर दक्षतापालन व लसीकरणाबाबत जिल्हाधिका-यांचे आवाहन

मोहिमेतून साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण

   ‘मिशन मोड’वर कामे केल्याने 20 टक्क्यांची झेप

अमरावती, दि.6 – कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे महाराष्ट्रात सात रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन करतानाच लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. लसीकरणासाठी राबवलेल्या मोहिमेमुळे लसीकरणाचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढून साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.  भारतात ओमायक्रॉनच्या 21 व महाराष्ट्रात 7 केसेस आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे अद्यापही ज्यांनी लस घेतलेली नाही, त्या नागरिकांनी लस घेऊन स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.  जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्व विभागांच्या समन्वयाने 9 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत साडेसहा लाख नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण अवघ्या 20 दिवसांत 20 टक्क्यांनी वाढले. सर्वांनी समन्वयाने काम केल्याने हे काम पुढे जाऊ शकले. विविध संस्था व नागरिकांचेही मोठे सहकार्य मिळाले. मोहिमेत लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी लसीकरणाचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व विभागांनी यापुढेही लसीकरणाचा वेग कायम ठेवून प्रत्‌येक पात्र व्यक्तीचे लसीकरण होण्यासाठी निर्धारपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.जिल्ह्यात सध्या 77 टक्के नागरिकांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेतलेली आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 35 टक्के एवढे आहे. दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, त्याचप्रमाणे कोविड प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. आरोग्य पथके व सर्व विभागांनी यापुढेही लसीकरणाचा वेग कायम ठेवावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button