मराठी

रेतीसह २ ट्रक आणि २ टिप्पर ट्रक जप्त

वरुड पोलिसांनी केली कारवाही

वरुड/दि. २६ – काल (ता.२५) रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मध्ये मध्यप्रदेशातून येत असलेले ओव्हरलोड अवैध रेती वाहतूक करणारे २ ट्रक आणि आज दुपारच्या सुमारास २ टिप्पर ट्रक रेतीसह लाखो रुपयाचा मुद्देमाल वरुड पोलिसांनी जप्त केला. या कारवाईमुळे वरुड तालुक्यासह अमरावती अकोला येथे सुद्धा अवैध रेती वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले असून या कार्यवाहीमुळे अवैध रेती वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुड तालुक्याच्या हद्दीतुन मध्यप्रदेश येथील माळुच्या रेतीची ओव्हरलोड अवैध वाहतूक होत असल्याची ओरड कायम असतांनाच ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली २ पथक तयार करुन मध्ये रात्रीचे सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक संघरक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक राजु चव्हाण, योगेश हिवसे, सुमित पेढेकर, सचिन भाकरे, उमेश ढेवले, चालक राजेश तायडे हे रात्रीच्या गस्तीवर असतांना मध्यप्रदेशातून पांढुर्णा-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाने अवैधरीत्या ओव्हरलोड रेती भरुन येत असलेले १ टिप्पर व १ ट्रक येतांना दिसले. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी शहरातील जायंटस् चौक येथे हे दोन्ही ट्रक थांबवुन चौकशी केली असता संबंधीत वाहन चालकांजवळ कोणतेही कागदपत्र मिळुन आले नाही.

यामुळे टिप्पर क्र.एम.एच.२७ बी.एक्स.४३४३ व आयशर ट्रक क्र.एम.एच.२७ बी.एक्स.१६१५ मधून ओव्हरलोड अवैध रेती वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने वरुड पोलिसांनी ते दोन्ही वाहन कलम २०७ मोटर वाहन कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले तर आज दुपारच्या सुमारास मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येत असलेले रेतीने भरलेले भरधाव व अनियंत्रीत ओव्हरलोड आयशर ट्रक क्र.एम.एच.२७ बी.एक्स.२४४४, टिप्पर क्र.एम.एच.२७ बी.एक्स.३८०७ व टिप्पर क्र.एम.एच.२७ बी.एक्स.३८०७ क्रमांकाची वाहने जप्त केली आहेत. या पाचही ट्रक आणि जप्त केलेल्या मुद्देमालाची रक्कम कोट्यवधी रुपये असल्याचे कळते. सदर कार्यवाही ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमंत चौधरी, सागर लेव्हरकर, अयज ठाकरे यांनी केली.
यावरून तालुक्यासह अमरावती-अकोला येथे सुद्धा मध्यप्रदेशातुन अवैध ओव्हरलोड रेती वाहतूक होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित कारवाई बाबत महसूल प्रशासनाला वरुड पोलिसांकडुन माहिती देण्यात आली असून आता या प्रकरणी महसुल प्रशासन काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर कार्यवाही वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वच क्षेत्रातुन कौतुक होत असले तरी अवैध रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Back to top button