अमरावती/दि. 8- सौर खादी उत्पादनांच्या विपणनासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी येथे केले.खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या औद्योगिक वसाहतीतील विकेंद्रित सौर चरखा समूह प्रकल्पाला काल जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. भेटीदरम्यान जिल्हाधिका-यांनी प्रथम महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हातचरख्यावर सूतकताई केली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठले, कार्यकारी अभियंता राहूल बन्सोड, नेत्रदीप चौधरी, श्यामल रोडे, शरद कोलटेके, सुमित नागपुरे आदी उपस्थित होते.
मांडू येथे सुताचे कापड होते
सौर चरखा समूहांतर्गत 300 महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतक-यांकडून कापूस खरेदी करून पेळू तयार केला जातो. पेळूपासून चरख्यावर सूतकताई करून धारणी तालुक्यातील मांडू येथे विणकाम केंद्रात सूतापासून कापड तयार केले जाते. या कापडावर अमरावती एमआयडीसी सामूहिक सुविधा केंद्रात प्रक्रिया करून विविध दर्जेदार खादी उत्पादने तयार केली जातात व त्यांची देशभर विक्री होते. कस्तुरबा सौर खादी महिला समितीकडून या प्रकल्पाचे संनियंत्रण होते. या उत्पादनांच्या भक्कम विपणनासाठी मध्यवर्ती व कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.कस्तुरबा समितीच्या अध्यक्षा रूपाली खडसे, सदस्य वर्षा चौधरी, वर्षा जाधव यांनी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. सौर चरखा सामूहिक सुविधा केंद्रातील प्रि-स्पिनिंग, प्रि-व्हिविंग, पोस्ट-व्हिविंग आदी प्रक्रियेची इत्थंभूत माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी जाणून घेतली व गत पाच वर्षांपासून प्रकल्प यशस्वीपणे चालवत असल्याबद्दल समिती सदस्यांचे कौतुक केले.