अमरावतीमराठीमुख्य समाचार
११ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळात
बडनेरा रेल्वे वॅगन प्रकल्पाचे लोकार्पण होणार का?
* गेल्या अनेक महिन्यापासून खा. राणा कडून पंतप्रधान मोदींना अमरावतीत आणण्याचे प्रयत्न
अमरावती / २९ जानेवारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. या दिवशी यवतमाळ येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा आहे. किमान पाच लाख महिला यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी यवतमाळ येथील विविध प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सोबतच ते पोहरा देवी येथेही भेट देण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिण्यापासून बडनेरा येथील रेल्वे वॅगन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून पंतप्रधान यांना अमरावतीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यात बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याचे लोकार्पण होणार का हे अद्याप निश्चित नाही.
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा या गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
अमरावती विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांना अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही तारीख देण्यात आली नाही. गेल्या नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिकडेच मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येवून गेले. आता पाचव्यांदा ते महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथील ११ फ्रेब्रुवारी च्या दौऱ्यानिमित्य, आज सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठका झाल्या. यवतमाळ जिल्ह्यात महिला बचत गटांचा मेळाव्यासाठी आणि विविध प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटांच्या पाच लाख महिलांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे चार महिन्यांपूर्वी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवीचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी हे फेब्रुवारी महिन्यात पोहरादेवी (जि. वाशिम) येथील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी येणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच अमरावती जिल्ह्याच्या खा. नवनीत राणा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमरावतीत आणण्याचे गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यात अमरावतीत जिल्ह्यात विकास कामांचे उदघाटन होणार का हे पाहावे लागणार आहे.