मराठी

रंगकाम करणाऱ्या तरुणाचा इमारतीवरून पडून मृत्यू

गोविंद टॉवर येथील घटना

नांदगांव पेठ/दि १२ – पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोटे फार्म समोरील गोविंद टॉवर येथे इमारतीचे रंगकाम करणाऱ्या तरुणाचा पाय घसरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.आमृपाल तुळशीराम वर्धे (३२) रा.सायत असे घटनेतील मृतक तरुणाचे नाव असून घटनेने सायत येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आमृपाल वर्धे हा शेतकरी कुटुंबातील असून शेतीची कामे नसल्याने तो सध्या रंगकाम करत होता.पोटे फार्म समोर गोविंद टॉवर ही इमारत पूर्णत्वास आली असून त्याची रंगरंगोटी सुरू आहे. या रंगकामासाठी आमृपाल वर्धे हा कार्यरत होता. आज सकाळी ११ वाजता त्याने कामाला सुरुवात केली आणि काम करतांना त्याचा पाय घसरून तो खाली पडला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने व प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आमृपाल चा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नांदगांव पेठ पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल कुरळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला.
घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश करीत रुग्णालयात धाव घेतली.आमृपाल हा एकटाच कमवता असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आमृपालवरचं होती.त्याच्या पश्चात आई बाबा भाऊ व लहान बहीण असून घटनेने संपूर्ण कुटुंबात शोककळापसरली आहे. सायंकाळी सायत येथे आमृपालवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Back to top button