मराठी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपत गृहयुद्ध

बंगळूर/दि.१५ – कर्नाटक भाजपतील अंतर्गत भांडणाच्या आगीत मुख्यमंत्री बी. एस .येदियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या निर्णयाने आणखी भर टाकली आहे. कर्नाटकच्या मंत्रिमंडळात सात मंत्रिपदे भरल्यानंतर भाजपत गृहयुद्धसदृश परिस्थिती बनली आहे. केवळ काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल सोडणारे आमदारच नव्हे, तर या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले भाजपचे ज्येष्ठ आमदारही आता त्यांच्याच पक्षाविरूद्ध बंडखोरी करायला लागले आहेत.
येदियुरप्पा यांना त्यांच्याच अश्लील सीडीचे भांडवल करून  तीन आमदारांनी धमकावले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्री केले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बी. आर. पाटील यत्नाल यांनी केला आहे. विजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की त्या आमदारांकडे मुख्यमंत्र्यांची एक अश्लील सीडी आहे. हे लोक त्या सीडीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करत आहेत. आता मंत्री झालेले तेच लोक दोन महिन्यांपूर्वी तीच सीडी घेऊन माझ्याकडे आले आणि मला येदियुरप्पा सरकार पाडण्यास सांगितले. पाटील पुढे म्हणाले, की मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र वैयक्तिक फायद्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उपयोग करीत आहेत. मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. विरोधी पक्षातील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या काही वरिष्ठ आमदारांकडेही ही सीडी असल्याचे भाजपच्या नेत्यानेच सांगितले. त्याद्वारे ते मुख्यमंत्र्यांना धमकी देत आहेत. त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठी इतके सरकारी पैसे मिळत आहेत, तर भाजपच्या आमदारांना काहीही मिळत नाही. लवकरच ही सीडी सार्वजनिक होईल. दुसरीकडे, जुलै 2019 मध्ये येदियुरप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यात मदत करणारे भाजपचे विधान परिषदेचे सदस्य एच. विश्वनाथ यांनी असे आरोप केले, की मुख्यमंत्री त्यांच्या एका अश्लील सीडीला घाबरतात. लवकरच ही सीडी सर्वांना दिली जाईल. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, डझनभरहून अधिक ज्येष्ठ आमदारांनीही मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button