मराठी

बिहार-महाराष्ट्रात संघर्ष

  • सीबीआय चाैकशीचा बिहारचा आग्रह
  • बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेवर मुंबईचा आक्षेप

मुंबई / पाटणाः सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत असतानाच सुशांतसिंह यांच्या वडीलांच्या फिर्यादीनंतर बिहार पोलिसही तपासासाठी मुंबईला दाखल झाले. एका पोलिस अधिका-याला क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याने बिहार विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष निर्माण झाला आहे. पाटण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी तो तपासासाठी मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवा होता; परंतु तसे न करता बिहार पोलिसांनी स्वतंत्र तपास केल्याने मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या कार्यकक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, बिहार विधानसभेच्या अधिवेशनात या प्रकरणाची सीबीआय चाैकशी करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन एकाच दिवसासाठी घेण्यात आले. त्याच सुशांतसिह राजपूत याच्या आत्महत्येच्या मुद्यावरच भर देण्यात आला. बिहार विधानसभेच्या इतिहासात पावसाळी अधिवेशनाची सर्व कामे एकाच दिवशी पहिल्यांदाच पूर्ण झाली. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षातील भाजपचे आमदार नीरजसिंग बबलू यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली. काँग्रेस, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय जनता दल आदी सर्वंच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालला असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मुंबई पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले, तेव्हा त्यांनी कुणावर संशय घेतला नव्हता.
बिहार पोलिसांच्या तपासाबाबत सिंह यांनी सांगितले, की पोलिसांनी पाटण्यामध्ये जी फिर्याद दाखल केली आहे, त्याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. बिहार पोलिस महाराष्ट्रात आले ते कोणत्या कायद्याच्या कक्षेत आले, याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. मुंबई पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. पैशांचा गैरव्यवहार, कुणी सुशांतवर दबाव टाकला का किंवा इतर काही कारण आहे, की नाही याची तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सोशल मीडिया’वर सुशांतसिंह आणि दिशा सलियन यांच्याबाबत चर्चा झाल्याने सुशांत डिस्टर्ब होता अशीही माहिती त्यांनी दिली.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लागलेले असतानाच आतामाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याप्रकरणी ट्वीट केले आहे. सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचे प्रकरण मानवतेच्या दृष्टिकोनातून अजिबात हाताळले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई आता सामान्यांच्या दृष्टीने असुरक्षित झाल्याची त्यांटी टिप्पणी वाद निर्माण करणारी ठरली. युवा शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले. मुंबई पोलिसांचे संरक्षण न घेता वावरून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. मुंबई पोलिसांवरच विश्वास नसेल, तर त्यांनी पुरवलेली सुरक्षा का सोडत नाही, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.

आयपीएस अधिकारी क्वारंटाई
सुशांतसिह आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या विनय तिवारी या आयपीएस अधिकाऱ्याच्या मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. तिवारी यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आल्याचे बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. क्वारंटाईनचे मुंबई महापालिकेने समर्थन केले असताना भाजपने त्यावर टीका केली आहे.

रिया चक्रवर्तीवर आरोप
सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिने १५ कोटी रुपये सुशांतसिंहच्या खात्यावरून काढले, असे म्हटले असले, तरी सुशांतच्या लेखापरीक्षकाने मात्र एवढी रक्कम त्याच्या खात्यात नव्हती, असे म्हटले आहे; मात्र
रियाने गेल्या 90 दिवसांत सुशांतच्या खात्यावरून तब्बल तीन कोटी रुपये काढल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे. रिया आणि तिचा भाऊ फरार झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

सुशांतला बनविले होते बंदी
रियाने सुशांतला मानसिक आजारावरच्या औषधांचे ओव्हरडोस दिल्याचे आणि 2019 मध्ये सुशांतला डेंगू झाल्याची अफवा पसरवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला एकप्रकारे बंदी बनवले होतं आणि ते सगळे मिळून त्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करत होते,  असे सुशांतच्या वडीलांनी रियाविरोधातल्या तक्रारीत म्हटले आहे.
राज्य सरकारमधील एक युवा मंत्री सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण दडवत असल्याचा आरोप होत आहे.

चाैकशीवर परिणाम
मुंबई विमानतळावर आल्यावर माझी कोणीही कोरोनाची चाचणी केली नाही किंवा त्यासंदर्भात माझी चौकशीही केली नाही. माझा कोरोना स्वॅबही घेण्यात आलेला नाही. मी ड्युटीवर आहे. त्यामुळे मला यातून सूट द्यायला हवी. मी १४ दिवस क्वॉरंटाइन राहिल्यास या प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होईल, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button