मराठी

काँग्रेसलाच पायलटांची जास्त गरज

घरवापसीची अनेक कारणे; दोन्ही गटात ऐक्यासाठी समिती

जयपूर/दि. १२ – गेल्या ३२ दिवसांच्या राजकीय संघर्षानंतर सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये परतण्याची अनेक राजकीय कारणे आहेत. सर्वांत मोठे कारण म्हणजे गुर्जर मतपेढी आणि दुसरे कारण म्हणजे त्यांचे सासरे फारूक अब्दुल्ला कुटुंबाचा दबाव आणि तिसरे कारण म्हणजे पायलट यांना पक्षात ठेवण्यासाठी काँग्रेसच्या युवा ब्रिगेडचा दबाव. त्यामुळे सरकारला धोका नसतानाही पायलट यांचे म्हणणे ऐकून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एक समिती नेमण्याची वेळ पक्षश्रेष्ठींवर आली.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काँग्रेसची गरज लक्षात घेऊन त्यांच्या घरवापसीची रणनीती तयार केली. राजस्थान व्यतिरिक्त हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील ब-यांच जागांवर गुर्जरांचा प्रभाव आहे. तेथे त्यांची भूमिका निर्णायक असते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोणत्याही परिस्थितीत पायलट पक्षात नको होते. त्यांनी पायलट यांच्या विरोधात एवढे आरोप केले, त्यांना पक्षातून घालवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. सरकार उलथवण्याइतकी ताकद पायलट यांच्यात नव्हती, तरीही त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न चालू होते. त्याचे कारण राजस्थानात असलेले आठ ते दहा टक्के गुर्जर मतदार. केवळ राजस्थानातच नव्हे, तर इतर राज्यातही गुर्जरांची मते विचारात घेऊन पायलट यांना काँग्रेसमध्ये थांबवण्यात आले. २०२२ मध्ये होणा-या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पायलट यांची गरज आहे.

उत्तर प्रदेशमधील ५५ विधानसभा आणि लोकसभेच्या १२ जागांवर गुर्जर मतदार निर्णायक भूमिका निभावतात. विधानसभा जागांसह गुर्जर मतदार पाच लोकसभा जागांवर प्रभाव पाडू शकतात. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येण्याचे प्रमुख कारण गुर्जर मतपेढी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना सचिन पायलट हे गुर्जर समाजातील भावी मुख्यमंत्री मानले जात आणि पूर्व राजस्थानमधील काँग्रेसला २० जागा दिल्या. मध्य प्रदेश, हरयाणा आणि दिल्लीमध्येही गुर्जर मतदारांची संख्या मोठी आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे दुसरा कोणताही मोठा गुर्जर नेता नाही. पायलट गुर्जर एक नेता तसेच एक तरुण आणि चांगला वक्ता आहे. काँग्रेसला २०२२ मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि २०२२ च्या लोकसभा निवडणुकीत गुर्जर-बहुल जागांचे थेट नुकसान होण्याचा धोका होता. पायलट यांची राजस्थानमध्येच नव्हे, तर अन्य राज्यात गुर्जर समाजावर पकड आहे. प्रियंका यांनी जेव्हा ही माहिती मिळविली, तेव्हा त्यांनी पायलट यांना परत आणण्याच्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली.

नातेवाइक-मित्रांची यशस्वी मध्यस्थी 

काश्मीरमध्ये फारूक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सची आणि काँग्रेसची युती आहे. पायलट हे फारूक यांचे जावई आहेत. फारूक यांनी पायलट यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी काँग्रेसवर दबाव आणला. तसेच माजी खासदार मिqलद देवरा यांनीही पायलट यांच्या घरवापसीसाठी पडद्याआडून सूत्रे हलविली.

Related Articles

Back to top button