अमरावती/दि. 3 – कोरोनाकाळात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे रूग्णांना विविध संस्थांच्या सहकार्याने घरपोच औषधे पुरविण्यात आली. ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी येथे काढले.
जागतिक एड्सदिनानिमित्त आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ. रेवती साबळे, राजेश बुरंगे, डी. के. वानखडे, सीमा भाकरे, ज्योती खडसे, प्रकाश शेगोकार, डॉ. रघुनाथ वाडेकर यांच्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य शिक्षण मंडळ, श्री सतदेव बाबा महिला मंडळ, मोझरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, भाग्योदय शिक्षण संस्था, समर्पण ट्रस्ट, साथी, आस्था, आधार संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रूग्णांना औषधे व उपचार पुरविण्यासोबतच सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. जागतिक एड्सदिनानिमित्त बाईक रॅली, शिबिर व ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. एचआयव्ही तपासणी, उपचार शासकीय इस्पितळांत मोफत व गोपनीय आहेत. टोल फ्री क्रमांक 1097 वर विविध भाषांमध्ये, तसेच नॅको ॲपवरही माहिती व मार्गदर्शन उपलब्ध आहे, असे श्री. साखरे यांनी सांगितले.