नगर/दि. ७ – नगर येथील जिल्हा न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणाची २० ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात २६ जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना हजर राहण्याचे आदेश दिले होते; मात्र त्यापूर्वीच चार ऑगस्ट रोजी इंदुरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.
त्यात जिल्हा न्यायालयाने हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदुरीकरांना दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात होणार आहे. सरकारी वकील आणि इंदुरीकर महाराजांचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. इंदुरीकर महाराजांना २० ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. दरम्यान, सत्र न्यायायालयाच्या स्थगिती आदेशावर तक्रारदार ड. रंजना गवांदे म्हणाल्या, की आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून कायदेशीर लढा आहे. सरकारी पक्षाकडे आम्ही आवश्यक ते पुरावे सादर केले आहेत. सरकार पक्ष आपली बाजू २० ऑगस्टला न्यायालयात मांडेल. स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर यांनी केले होते.
लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने त्यांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदुरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता. इंदुरीकर महाराजांचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया‘त व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती इंदुरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता; मात्र ड. गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा केला. या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर २६ जून रोजी संगमनेर येथील न्यायालयात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.