नवीदिल्ली/दि.१७ – नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्याथ्र्यांचे करिअर आपण संकटात टाकत आहोत, असे म्हटले. खंडपीठाने या वेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असेही या वेळी न्यायालयाने सांगितले. कोरोनावरील लस लवकरच येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही १५ ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. आम्ही अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत नसून फक्त काही वेळा ती पुढे ढकलली जावी, अशी विनंती करत असल्याचे वकील अलख यांनी या वेळी सांगितले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या वेळी परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल, असे न्यायालयाला सांगितले. न्या. मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचे नुकसान होणार नाही का ? असा सवाल विचारत विद्याथ्र्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल असे म्हटले. चौकट अंतिम वर्षांच्या परीक्षाबाबतही हाच निकष कोरोनाचे कारण पुढे करून महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी याचिका दाखल केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने याप्रकरणात अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश डावलून परीक्षा रद्द करण्याचा अधिकारच राज्यांना नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी होणा-या सुनावणीत काय निर्णय लागेल, याकडे लक्ष लागले आहे.