-
म्हणाले रामाचा जन्म नेपाळ मध्ये झाला
नेपाळ/दि.९ -पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या देशात भगवान रामाचे भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रामाचा जन्म नेपाळमध्ये झाल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला होता. गेल्या महिन्यात केपी शर्मा ओली यांनी नेपाळमधील ठोरीजवळ अयोध्यापुरी भगवान रामाची जन्मभूमी असल्याचा दावा केला होता. रामाचे खरे जन्मस्थळ नेपाळमध्येच आहे. सांस्कृतिक अतिक्रमणे करताना भारत खोट्या तथ्यांच्या आधारे उत्तर प्रदेशातील अयोध्या हे राम जन्मभूमी सांगत आहे, असा आरोप केपी शर्मा ओली यांनी भारतावर केला होता.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या या वक्तव्याचा भारतात तीव्र विरोध झाला. नेपाळमध्ये राजकीय पक्ष आणि सामान्य जनतेनेही निषेध केला. केपी शर्मा ओली यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शविला होता. असे असूनही, पंतप्रधान केपी शर्मा ओली आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आणि आता तर त्यांनी त्या ठिकाणी भव्य राम मंदिर बांधण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेपाळची सरकारी वृत्तसंस्था नॅशनल न्यूज कमिटीच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ठोरी आणि माडी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना काठमांडू येथे बोलावून भगवान श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचबरोबर, केपी शर्मा ओली यांनी माडी पालिकेचे नाव बदलून अयोध्यापुरी असे करण्यास सांगितले आहे. तसेच, परिसरातील जागा अधिग्रहण करून अयोध्यासारखे विकसित करण्यास सांगितले आहे. तसेच, याठिकाणी भव्य राम मंदिर बांधणे आणि राम-सीता आणि लक्ष्मण यांच्या मोठ्या मूर्ती तयार करण्यास सांगितले आहे.
नॅशनल न्यूज कमिटीनुसार, या दसऱ्यात रामनवमीनिमित्त राम मंदिराचे भूमिपूजन करून बांधकाम सुरु करण्याचे आणि दोन वर्षानंतर पुन्हा रामनवमीच्या मुहूर्तावर राम मूर्तीचे अनावरण करण्याबाबत पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे. नेपाळ सरकारनेही मंदिर बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.