मराठी

चीनच्या लसीवर नाही कुणाचाच भरवसा

पाकिस्ताननेही हात आखडले

बीजिंग/दि.३० –  कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ब-याच देशांनी बड्या कंपन्यांच्या लसीचे आगाऊ पैसे भरून आरक्षण केले आहे; पण विश्वासाच्या चाचणीत चीनची लस अपयशी ठरत आहे. जगाला कोरोनाची भेट देणा-या चीनने आता लसींचा साठा तयार केला आहे. त्याच्याकडे लस तयार करण्याचे सहा फॉर्म्युले आहेत; परंतु कोणताही देश त्याच्या लसीवर विश्वास ठेवायला तयार नाही. चीनच्या लसीच्या सौदी अरेबिया, तुर्कस्तान,  इंडोनेशिया,  ब्राझील, पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये चाचण्या सुरू आहे; परंतु सार्वजनिक सर्वेक्षण आणि अधिका-यांनी दिलेल्या निवेदनात असे दिसून आले आहे, की चीन या देशातील कोट्यवधी लोकांना लसीच्या सुरक्षेची हमी देण्यात अपयशी ठरला आहे. कराची येथील दुचाकी चालक फरमान अली शाह म्हणाले, की मी ही लस घेणार नाही, मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ब्राझीलमधील लोकांचा चीनवर विश्वास नाही त्याच वेळी, ब्राझीलमधील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की 50 टक्के लोकांना चीनची लस नको आहे.
चीनवर गरीब देशांच्या या अविश्वासामुळे जगासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. लोकांना वाटते, की त्यांना दुय्यम दर्जाची लस दिली जाईल. यामागील प्रमुख कारण म्हणजे सायनोवाकच्या अंतिम टप्प्यातील चाचणीच्या निकालांची केवळ काही माहिती सार्वजनिक केली गेली आहे. तर अमेरिकन आणि युरोपीय कंपन्यांनी पूर्ण आकडेवारी दिली आहे. या अनिश्चिततेमुळे आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. त्याने कित्येक देशांना निकृष्ट मुखपट्या, टेस्ट किट आणि पीपीई किटस्‌ निर्यात केले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्लूमबर्गला सांगितले, की दोन टप्प्यांच्या चाचण्यांमध्ये चिनी लस सुरक्षित असल्याचे आढळले. अद्याप उलट परिणाम दर्शविला नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे, की ज्या सरकारांनी लसीचे आरक्षण केले नाही. त्यांना चीनच्या लसीचा एकमेव पर्याय असेल. कारण पुढच्या वर्षी, जवळजवळ 1200 कोटी डोसपैकी तीन चतुर्थांश डोस श्रीमंत देशांनी बुक केले आहेत. चिनी लस कंपन्यांच्या लसीच्या 16 देशांमध्ये तिस-या  टप्प्यातील चाचणी सुरू आहे.  आतापर्यंत संयुक्त अरब अमिराती आणि चीनने स्वत: लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

Related Articles

Back to top button