मराठी

राज्यातील दहा शहरांमध्ये स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्र उभारणार

वाहन तपासणीत गैरव्यवहार होत असल्याने राज्य सरकारचा निर्णय

ठाणे/दि.४ – प्रादेशिक परिवहन विभागाने राज्यातील दहा शहरांमध्ये स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १३६ कोटी रुपयांच्या निधीस राज्य शासनाकडून मंजूर देण्यात आली आहे. मर्फी-ठाणे, नांदिवली-कल्याण, ताडदेव-मुंबई, तळोजा-पनवेल, नागपूर- हिंगणा, पिंपरी-चिंचवडसाठी, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती आदी दहा ठिकाणी हे स्वयंचलित वाहन तपासणी व वाहन परीक्षण-केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
रस्त्यांवर धावणाऱ्या व्यावसायिक अवजड वाहनांची दर दोन वर्षांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) फिटनेस तपासणी केली जाते. या तपासणीत वाहन प्रदूषणाचा फैलाव तर करीत नाही ना या कारणासह वाहनाचा वेग, चाके, लाईट, ब्रेक आदी बाबींची काटेकोरपणे पडताळणी केली जाते. या सगळ्या बाबींच्या तपासणीत वाहन योग्यरित्या कार्य करीत असल्याचे आढळून आल्यास त्या वाहनास संबंधित आरटीओ कार्यालयाकडून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.
मात्र, ही तपासणीची पद्धत पूर्णतः मानवी नियंत्रणाखाली केली जाते. त्यामुळे अशा वाहन तपासणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून येत होत्या. काही ठिकाणी तर अशी प्रमाणपत्रे एजंट मार्फत बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे देखील आढळून आले होते. त्यामुळे वाहन तपासणी प्रक्रियेत होणारा मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी राज्यात स्वयंचलीत तपासणी केंद्र उभारण्यात यावीत अशी मागणी जोर धरत होती. तसेच अशी मागणी करणारी एक याचिका देखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

या याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्रे स्थापन करण्यावर भर देतांना २५० मीटरचा वाहन टेस्ट ट्रॅक आवश्यक असल्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात मोजक्या ठिकाणी असे ट्रॅक तयार करण्यात आले. मात्र, बहुतांश ठिकाणी जागे अभावी हा उपक्रम रखडला गेला. त्यानंतर राज्यातील ५० आरटीओ विभागांपैकी १० ठिकाणी स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्र उभारण्याची तयारी आरटीओ विभागाने सुरू केली होती.
मात्र त्यात देखील निधीची अडचण उभी राहिल्याने गेली चार वर्षे हा प्रकल्प प्रलंबित होता. अखेर गृह विभागाने राज्यातील १० ठिकाणी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे स्थापन करण्यासाठी १३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान ज्या ठिकाणी केंद्रांमध्ये प्रशासकीय इमारतींसह वाहन तपासणीसाठी चार पदरी धावपट्टी, डीजी सेटसह तत्सम यंत्रसामग्रीचा समावेश राहणार आहे.यासाठी स्वमालकीची जागा असणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाची जागा असल्यास त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, स्वयंचलीत वाहन तपासणी केंद्रास निधी मंजूर झाल्याने या कामांस गती मिळून आरटीओच्या कारभारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. तसेच वाहन चालकांची देखील डोकेदुखी कमी होऊन रस्त्यावरील अपघात कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

परदेशातून मशिन आयात?

खासगी वाहनांच्या मशिन आणि अन्य तपासणीसाठी केंद्र शासनाच्या मदतीने राज्यात पहिले आय अँड सी सेंटर नाशिकला सुरू करण्यात आले आहे. येथे लागणाऱ्या सर्व मशिन स्पेनमधून आयात करण्यात आल्या आहेत. परदेशी अभियंत्यांनी याकेंद्रात प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर आता राज्यात अशी दहा स्वयंचलीत केंद्रे स्थापन होणार असल्याने आणखी मशीनची गरज भासणार आहे.

या सर्व मशीन देखील परदेशातून आयात करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते

Related Articles

Back to top button