अमरावती, दि. 4 : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना एल.आय.सी. योजनतंर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एकरकमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
मुंबईत मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचे लाभ तत्काळ देण्याचे निर्देश दिले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एल.आय.सी.) चे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री एड. ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एल.आय.सी. योजनेतंर्गत एक रक्कमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरु आहे. या योजने अंतर्गत २०२०-२१ या वर्षांत ९०० प्रकरणे आली होती यापैकी ८७५ प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित त्रुटी असणाऱ्या आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
एल.आय.सी.मार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची ६५ वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येतो. तसेच राजीनामा, सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावल्यालेल्या सेविकांच्या वारसदारांनाही एव्हढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ७५ हजार रक्कम देण्यात येणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.