घरी राहूनच दसरा साजरा करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
यवतमाळ/दि. 24 – दरवर्षी आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट आले आहे. या संकटावर विजय मिळवायचा असेल तर सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षीचा दसरा सण घराच्या बाहेर न पडता कुटुंबा सोबतच साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे वने, भुकंप पूनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
गेल्या अनेक शतकपासून आपण दसरा हा सण उत्साहाने साजरा करतो. मात्र यावर्षी हा सण आपल्याला कुटुंब सोबत राहून घरातच साजरा करायचा आहे. सध्या महाभयानक अशा कोरोनाची साथ सुरू आहे. या महामारीमुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. कित्येक कुटुंबाचा आधार गेला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी या महामारीविरुध्द दिवसरात्र लढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे काही अटी घालून दिल्या आहे. त्या अटींचे पालन करून आपण कोरोनाच्या संघर्षात विजयी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे व मास्क वापरणे हेच महत्वाचे आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी दसरा सण कुटुंबासोबत घरात राहूनच साजरा करा, आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.