मराठी

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात कोरोनाचा समावेश

अध्यक्ष डॉ. विनोद कुमार पॉल यांनी निर्णय जाहीर केला

मुंबई/दि. २४ – कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून या आजाराने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ने याची दखल घेऊन ‘एमबीबीएस’ च्या वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘महामारीचे व्यवस्थापन ( pandemic managment) या विषयाचा समावेश केला आहे. ‘एमसीआय’ चे अध्यक्ष डॉ. विनोद कुमार पॉल यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला.
जगभरातील बहुतेक देश आजही कोरोनावर उपचार आणि त्याला रोखायचे कसे, या चिंतेत आहेत. गेले सहा महिने भारतातही कोरोनाचा अटकाव करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या महामारीचा सामना करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, कोणती सामाजिक पथ्ये पाळायची, उपचार काय असतील इथपासून लस कधी येणार असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. रेमडिसीवीर(Remedisivir) व टेलिलोझुमॅब ही औषधे कोरोनावर फारशी उपयोगी नाहीत व मृत्यू रोखण्यासाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही डॉक्टरांकडून रुग्णांना ही औषधे आणण्यासाठी आग्रह सुरूच आहे.

या पाश्र्वभूमीवर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच त्यांची गव्हर्निंग बॉडी आणि नीती आयोगाने वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘पँडॅमिक मॅनेजमेंट या विषयाचा समावेश असावा अशी भूमिका घेतली. या विषयाच्या अभ्यासात जागतिक महामारीचा इतिहास, आजाराच स्वरुप, रुग्णतपासणी, सामाजिक दृष्टिकोन, कायदेशीर बाबी, आजार व्यवस्थापन, प्रशासकीय बाबी तसेच आरोग्याचे अर्थशास्त्र, साथरोग, तसेच संशोधन, लस विकास आणि शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील उपचार आदीचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या हा विषय एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी असला तरी यापूर्वी इबोला, सार्स, बर्डफ्लू, अशा अनेक साथींचा सामना जागतिक स्तरावर करावा लागला आहे. कोरोनाचा विचार करता आगामी काळात नवीन महामारी आल्यास भारतीय डॉक्टर त्याचा सामना करण्यासाठी सर्वार्थाने तयार असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन एमबीबीएस च्या सर्व वर्षात ‘महामारीचे व्यवस्थापन हा विषय शिकवला जाणार आहे.

Related Articles

Back to top button