मराठी

कोरोना संसर्गात भारत दुस-या क्रमांकावर

ब्राझीललाही टाकले मागे; एका दिवसांत नव्वद हजार रुग्ण

नवीदिल्लीः भारतात कोरोना विषाणूने ४० लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. आजवर ७० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारतापुढे आता केवळ अमेरिकाच आहे.
अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा हा ६२ लाखांच्या पुढे आहे. तेथे एक लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २२ लाख ८३ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. या देशात अद्याप ३७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित लोक आहेत. ब्राझीलमध्ये बाधितांचा आकडा हा ४१ लाखांच्या जवळपास आहे, तर एक लाख २५ हजारांहून अधिक लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये ३४ लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत, तर पाच लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझीलला मागे टाकल्याचे स्पष्ट झाले.
भारतात एकाच दिवसांत ९० हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. भारतात ४१ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. दुसरीकडे मागील २४ तासांमध्ये ७० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ इतके बाधित आढळले. एक हजार ६५ जणांचा मृत्यू झाला. भारतात एकूण ४१ लाख १३ हजार ८१२ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ७० हजार ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६५ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवार कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार होण्याचे प्रमाण ७७.३२ टक्के इतके झाले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचे प्रमाण मात्र कमी होत आहे.

१२ दिवसांत दहा लाख रुग्ण
भारतात सात ऑगस्ट रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ओलांडला, तर, २३ ऑगस्ट रोजी ही संख्या ३० लाख इतकी झाली. पाच सप्टेंबर रोजी ही संख्या ४० लाख इतकी झाली. भारतात आतापर्यंत चार कोटी ८८ लाख ३१ हजार १४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे

Related Articles

Back to top button