त्रिपुरातील घटनेचे नांदेडमध्ये तीव्र पडसाद
मुस्लिम समाजाच्या मोर्चाला गालबोट, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड
नांदेड़ /दि.१२ – त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्रिपुरा इथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. तसंच निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचं नुकसान करण्यात आलं. तसंच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचं मोठं नुकसान करण्यात आलं.
दोन पोलिस किरकोळ जखमी
पोलिसांना जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रू धुराच्या नकळांड्या फोडाव्या लागल्या. तसंच सौम्य लाठीमारही करण्यात आला. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी देगलूर नाका परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
देवेंद्र फडणवीसांकडून चिंता व्यक्त
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसंच सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. ‘त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!’, असं ट्विट फडणवीसांनी केलंय.