टोकियो दि. ११ – चीनच्या नौकांनी घुसखोरी केल्यास थेट लष्करी करणार असल्याचा इशारा जपानने दिला आहे. पूर्व चीन समुद्रात चीनच्या मासेमारी नौका सातत्याने जपानच्या हद्दीत प्रवेश करत आहेत. त्यावरून जपान नाराज आहे. मासेमारी नौकांच्या घुसखोरीला चीनची फूस असल्याचा जपानला संशय आहे. दिआओयू बेट समूहावर जपानचे नियंत्रण आहे. चीन आणि जपानमध्ये या बेटांच्या ताब्यावरून वाद सुरू आहे.
जपानच्या हद्दीत घुसखोरी करणारया मासेमारी नौकांची संख्या शंभरांच्या आसपास असते आणि सगळ्यांना चिनी तटरक्षक दलाचा पाठिंबा मिळाल्यास जपानी सैन्याला त्यांना प्रत्युत्तर देणे कठीण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चीनने आपली हेकेखोरी कायम ठेवली आहे. दिआओयू बेट समूह हा आमच्याच देशाचा भाग असून चिनी मच्छिमारांना अटकाव, बंदी घालू शकत नसल्याचे चीनने म्हटले आहे. जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांनी सांगितले, की जपानी सैन्य चीनच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. याआधी २०१६ मध्ये ७२ चिनी जहाज आणि चीन कोस्ट गार्डच्या २८ जहाजांनी चार दिवस या भागात घुसखोरी केली होती. मागील १८ महिन्यांपासून चिनी कोस्टगार्ड जहाजांकडून सातत्याने जपानवर दबाव निर्माण केला जात आहे. जपानने सातत्याने सतर्क केल्यानंतरही चिनी जहाज १११ दिवस या भागात घुसखोरी करीत होते.
चीनला जपान तटरक्षक दलाची जागा घ्यायची असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दिआओयू बेटांवर ताबा मिळवण्याचा मनसुबा चीनचा आहे. चीनने असे केल्यास जपानला प्रत्युत्तर देणे सध्या कठीण जाण्याची चिन्हे आहेत. याआधी या भागात रशिया आणि उत्तर कोरियाच्या घुसखोरांशी जपानला सामना करावा लागला होता. दरम्यान, भारत, जपान आणि अमेरिकेसोबत तणावाचे संबंध असताना आता चीनने या तणावात आणखीच भर टाकली आहे. चीनने दोन अणवस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘च्या रॉकेट फोर्सने नुकत्याच झालेल्या युद्ध सरावा दरम्यान डीएफ-२६ आणि डीएफ-१६ क्षेपणास्त्रांची चाचणी केली.
चीनच्या डीएफ-२६ क्षेपणास्त्रे ही अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ४००० किलोमीटर असल्याचे सांगतिले जाते. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात पूर्ण भारतासह पॅसिफिक महासागरातील अमेरिकेचा गुआम नाविक तळही येतो. चिनी लष्कराच्या ताफ्यात या क्षेपणास्त्राला २०१६ मध्ये सहभागी करण्यात आले होते. या क्षेपणास्त्रांमध्ये १२०० ते १८०० किलो वजनाचे अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.