मराठीलेख

विशेष लेख: ग्रंथालय आपल्या दारी। ज्ञानगंगा पोहचली घरोघरी।।

वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ अभिनव संकल्पना

मराठी भाषा गौरव दिना निमित्त विशेष लेख

मोबाइलमुळे वाचन संस्कृती लुप्त होत असून यासाठी ग्रंथालय नावाची व्यवस्था ही अधिकाधिक आधुनिक केली पाहिजे. वाचन संस्कृती वाढण्यासाठी पोस्टल लायब्ररी संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत ‘संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’ द्वारा प्रायोजित आणि आयोजित वाचन संस्कृतीसाठी ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ ही अभिनव संकल्पना मौजे धरणगुत्ती माजी सरपंच शेखर कलगोंडा पाटील, सरपंच श्रीमती विजया देवाप्पा कांबळे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत मधुकर केंबळे, कर्मचारी आणि पदाधिकारी, स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी भानूसे आणि सदस्य, शाळेचे पालक आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांच्या सहकार्याने राबवली जात आहे.
‘जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या जिल्हा परिषदेच्या शतकोत्तर गौरवशाली शिक्षणाची परंपरा आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या शाळेतील इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवारी एक वाचनीय पुस्तक घरी दिले जाते. विद्यार्थी सदर पुस्तकाचे वाचन करून आपण वाचलेल्या पुस्तकावर प्रतिक्रिया लिहून पुस्तक पुढील शनिवारी परत करतात आणि परत नवीन पुस्तक घेऊन जातात. विद्यार्थ्यांना वेळोवेळी एकच गोष्ट सांगितली जाते ती ही की, वाचत रहा…. आपले मत मांडत रहा…. पुस्तके हेच आपले गुरु आहेत. त्यांचा आदर करा…. नियमित वाचन करत रहा.
वाचलेल्या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी आणि सुविचार इत्यादी आपल्या ‘वाचन नोंदवही’ मध्ये लिहितात तसेच आपण वाचलेल्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, पुस्तकाची किंमत आणि प्रकाशनाची तारीख इत्यादी लिहून ठेवतात. काही निवडक विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांच्या मदतीने आपण वाचलेल्या पुस्तकावरचा अभिप्राय संबंधित लेखक आणि प्रकाशक यांना लेखी पत्र लिहून कळवतात.
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अवांतर वाचनासाठी निवडलेले पुस्तक आठ दिवस त्यांच्या घरी असते या कालावधीत त्यांचे आई – वडील, आजी – आजोबा, बहीण – भाऊ आणि त्यांचे मित्र मंडळी सदर पुस्तकाचे वाचन करतात. आज खर्‍या अर्थाने संपूर्ण कुटुंबंच्या कुटुंब वाचनाकडे वळत आहेत हा एक खूपच चांगला आणि सकारात्मक बदल ‘मौजे धरणगुत्ती’ या लहानशा गावात पहावयास मिळत आहे.
‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ ही अभिनव संकल्पना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या सद् हेतूने संपूर्णपणे विनामूल्य राबवली जात आहे. पुस्तकांच्या वाचनासाठी कोणतेही प्रवेश शुल्क, किंवा मासिक शुल्क अथवा अनामत रक्कम घेतली जात नसून शालेय अभ्यासाबरोबरच मुलांना वाचनाचीही मेजवानी मिळावी या दृष्टीने सर्वच पातळीवर एकत्रितपणे प्रयत्न केले जात आहेत.
‘संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान’ यांच्या माध्यमातून कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, बालसाहित्य, नाटक – एकांकिका, सामान्यज्ञान, इतिहास, पर्यावरण, चरित्र – आत्मचरित्र, प्रवास वर्णन, अनुभवकथन, व्याकरण, शब्दकोश, आरोग्य, शेती विषयक, थोरांची माहिती, म्हणी, सुविचार, विज्ञान विषयक, मूल्यशिक्षण, व्यवसाय विषयक, व्यक्तिमत्त्व विकास आणि अन्य विविध विषयांवरील मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके मोफत उपलब्ध करण्यात आली. पुस्तकांची देवाण – घेवाण आणि सदर उपक्रमाचे उत्तम रीतीने संयोजन करण्यासाठी स्वयंसेवक विनामूल्य सेवा देत आहेत.
वाचनामुळे चांगल्या प्रकारे ज्ञान संपादित करता येत असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. ग्रंथालयाच्या उपक्रमामुळे समाजात जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. वाचकांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी आणि एकंदरीत समाज विकास होण्यासाठी ग्रंथालयाचेही योगदान महत्त्वाचे आहे. स्वत:चा शोध घ्यायचा असेल तर मानसिकदृष्ट्या कणखर असण्याची गरज आहे. हा कणखरपणा भावतालकडे पाहण्याची आपली दृष्टी समृद्ध करतो. स्वत:चा शोध घेण्याच्या प्रक्रियेत विवेकवादाचे अधिष्ठान महत्त्वाचे असते. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता समतोल पद्धतीने आपले भावविश्व विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून समृद्ध केले पाहिजे.
शाळांचा वार्षिक निकाल लागून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की, सुट्टीत काय – काय करायचे, याचे बेत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा संपण्यापूर्वीच केलेले असतात. पूर्वी सुट्टी कधी सुरू व्हायची आणि कधी संपायची तेच कळत नव्हते अशा आठवणीत पालक नेहमीच रंगून जातात. तथापि सुट्टी लागायच्या अगोदरच अनेक पालकांना मुलांचे सुट्टीत काय करायचे हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. सुट्टी सुरू होताच समाज माध्यमावरील पालकांच्या समूहात तशी चर्चादेखील सुरू झाल्याचे आढळते. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाचे आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहत असतात.
किती पालक मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे भवितव्य ठरवायची परवानगी देतात? किंबहुना आपल्या अपूर्ण इच्छा मुलांनी पूर्ण कराव्यात अशीच बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. महिना – दीड महिन्याच्या सुट्टीतही त्यांचे वेळा पत्रक व्यस्त असावे आणि मुलांना कुठेतरी अडकवून टाकावे असे पालकांना का वाटते? सुट्टी मुलांच्या मनासारखी घालवू द्यायला, त्यांच्याही नकळत त्यांना जीवन कौशल्ये शिकवण्यासाठी सुट्टी उपयोगात आणता येते. मुले वाचत नाहीत ही बहुसंख्य पालकांची तक्रार असते.
मुलांचे निसर्गाशी व पुस्तकांची मैत्री करून देण्यासाठी सुट्टीचा उपयोग करून घेता येऊ शकेल. वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. पुस्तकांमुळे मुलांना नवीन जगाची ओळख होते. आव्हाने स्वीकारून त्यांच्यावर मात करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक व्यवसायात वाचनाचा उपयोग होत असतो. उत्तम वाचन करणार्‍यांना सध्याच्या जगात चांगले दिवस आले आहेत. अन्न हे पोटाची भूक भागवते त्या पद्धतीने वाचन डोक्याची भूक भागवत असते. साक्षरतेकडून शहाणपणाकडचा प्रवास हा वाचनामुळेच संपन्न करता येतो. वाचन आपल्या जीवनात जाणि‍वा समृद्ध करीत असते. त्यामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियमित वाचनाची सवय लावून घेणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
वाचनाच्या माध्यमातून त्यांच्याचसारखी माणसे कष्टसाध्य यश कसे मिळवतात हे समजते. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, ‘वाचाल तर वाचाल’, ‘कष्टाविना फळ ना मिळते’ अशा अनेक म्हणींचे व्यावहारिक दाखले थोरा – मोठ्यांच्या आत्मचरित्रातून मिळू शकतात. व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण जडण – घडणीत पुस्तके फार महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक शाळेत वाचनाचा तास सक्तीचा केला गेला पाहिजे. वर्षभर पाठ्यपुस्तके हेच मुलांचे जग असते. सुट्टीत त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावता येऊ शकते. ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून उन्हाळी सुट्टीत चालवलेल्या विशेष अभियानांतर्गत शेकडो मुला – मुलींनी विविध विषयांवरील पुस्तके वाचली आणि त्यातून ‘सुट्टीत वाचन संस्कृती रूजविण्यासाठी’ प्रयत्न केल्यास त्यांना भरघोस यश नक्कीच मिळते याचा प्रत्यय सदर उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी आलेला आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर जसे की, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी प्रचंड गर्दी करून अगदी पुस्तके मिळवण्यासाठी रांगा लावल्या. दुसरे असे की पुस्तकांची देवाण – घेवाण करण्याची वेळ सकाळी ९ – ते १० अशी असताना मुले सकाळी तयार होऊन सात वाजताच येत असत. हा अनुभव निश्चितच प्रेरणादायी असून मुले आवडीने वाचतात आणि मुलांना वाचायला आवडते हे अधोरेखित झालेले आहे; मात्र आम्ही पालक – शिक्षक आणि वडीलधार्‍या मंडळींनी मुलांना त्यासाठी प्रेरित करून योग्य त्या वातावरणाची निर्मिती करून द्यायला हवी. आज ‘मौजे धरणगुत्ती’ या गावातील विद्यार्थी आणि पालक यांची वाचनाची आवड लक्षात घेता ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून खर्‍या अर्थाने ‘मौजे धरणगुत्ती’ या गावाची होत असलेली वाटचाल अभिमानास्पद असून वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी उचललेले पाऊल गावाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद आहे. आपणही आपल्या परिसरात समाजाला उपयोगी असणारे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. वाचनामुळे आयुष्यावर होणार्‍या संस्कारांची महती पटलेली अनेक माणसे आणि संस्था वाचन संस्कृतीच्या संवर्धंनासाठी झटतात. समाज माध्यमांवर एक रिक्षावाले खूप प्रसिद्ध झाले आहेत. ते त्यांच्या रिक्षात छोटेसे वाचनालय चालवतात. प्रत्येक प्रवाशी रिक्षात कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे तरी बसतो. या वेळेत त्यांनी पुस्तक चाळावे आणि जमले तर थोडे तरी वाचावे अशीच त्यांची अपेक्षा माफक असणार.
जयसिंगपूर येथील एक उपक्रमशील आणि आदर्श शिक्षिका सौ. रोझमेरी राज धुदाट आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे अनुवादक राज धुदाट यांनी त्यांच्या ‘ग्रेस फॅमिली फेलोशिप, जयसिंगपूर’ या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत वाचनीय अशी शंभर पुस्तके ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ या अभिनव संकल्पनेच्या उपक्रमासाठी दान देऊन वाचन चळवळीसाठी हातभार लावला आहे. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी यथोचित सहकार्य देऊ केलेले आहे.
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे गरजेचे:
सहा वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांचा तसेच मोठ्यांनीही मोबाइल वापराबाबत आपला वेळ निश्चित करावा, त्याचबरोबर मुलांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे चश्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे असे वेगवेगळे त्रास होऊ लागतात. शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठदुखी, कंबरदुखी. स्थूलपणा असे आजार होतात. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला आहे. बाल, किशोर, युवा पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडलेली आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी व्यवहारातील गुरूंबरोबर ग्रंथगुरूंची अत्यंत आवश्यकता आहे.
स्वास्थ्य चांगले तरच आरोग्य सुंदर होईल:
मोबाइलमधून उत्सर्जित होणार्‍या लहरींमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे मात्र, मोबाइल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होतो हे पूर्णपणे सिद्ध झालेले नाही. शास्त्रज्ञ याबाबत अनेक संशोधन करीत आहेत, यामागचं उत्तर त्यांना अद्याप सापडलेलं नाही. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, सामाजिक अशा सर्वांगीण पातळीवरचे स्वास्थ्य चांगले ठेवले तरच आरोग्य सुंदर होईल, यासाठी आपलं वागणं, बोलणं, ऐकणं, चालणं यासारखी जगण्याची तत्त्वे आत्मसात करण्याची गरज आहे. निरोगी आरोग्यासाठी जे कच्चे खाता येते ते शिजवू नये, जे शिजवून खाता येते ते तळू नये आणि तळलेले पदार्थ मसाल्यात मळवू नये अशा पद्धतीचा सकस आहार घेतल्याने शारीरिक आरोग्य चांगले राहते. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. एखाद्याचे चांगले झाले तर त्याचे अभिनंदन करणे, चुकले तर माफी मागणे, एखाद्याने केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले गेले तर मानसिक आरोग्य चांगले राहते. निसर्गाची सेवा केली तर निसर्ग तुम्हाला भरभरून देत राहील.
मोबाईल हातात नसलेला माणूस बघणं ही आज तशी अत्यंत दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. सतत मोबाईलच्या स्क्रीनमध्ये डोकं घालून बसलेली कितीतरी माणसं अवतीभवति दिसतील. मोबाईल हातात म्हणजे सगळं जग हातात, अशी स्थिती असली तरी याच मोबाईलवर किती वेळ घालवायचा हे ठरलेलं नसणार्‍यांचं जग मोबाईल अक्षरश: बिघडून टाकतो. पण मोबाईलचा वापर ‘स्पेसिफिक’ करणार्‍यांचं जग मात्र हाच मोबाईल घडवतो. जगण्याचा अविभाज्य भाग झालेला मोबाईल आयुष्यात कसा असावा, कसा नसावा, हे समजून घ्यायलाचं हवं. इंटरनेटवरील सर्वच माहिती ही खरी व बिनचूक नसते ही उघड बाब आहे. फेक न्यूज, मिस-इन्फॉरमेशन आदींनी इंटरनेट गच्च भरलेले आहे. यामुळे याच माहितीवर प्रक्रिया करून एखाद्या विषयाबाबत इंटरनेटने दिलेले उत्तर वा तयार केलेले कंटेंट हे अर्थातच परिपूर्ण नसेल. भले तुमच्याकडे माहिती असेल पण त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी माणसाला बुद्धी लागते. आपल्याकडे महितीचा इतका मारा होतो की, लोकांना त्याचा अन्वयार्थ लावता येत नाही. जेव्हा महितीचा मारा वाढतो, तेव्हा गोंधळ अधिक होतो. त्यामुळे जगात तंत्रज्ञान आलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं हे खोटं आहे.
मध्यंतरी एक किस्सा वाचला होता. वर्गात शिक्षक मुलांना प्रश्न विचारतात. सांगा बरं, समुद्राकडे तोंड करून उभं राहिल्यावर समोर सूर्योदय दिसतो की सूर्यास्त? त्यावर एका हुशार विद्यार्थ्याने उत्तर सांगितले की, आपण समुद्राच्या कुठल्या बाजूला उभे आहोत, त्यावर ते अवलंबून आहे. समुद्र म्हणजे सूर्यास्त हे समीकरण भारतीयांच्या डोक्यात पक्कं असतं. मात्र समुद्राला दुसरी बाजूदेखील असते आणि तिकडे उभं राहून सूर्योदय दिसू शकतो. मोबाईल हादेखील एक समुद्राच आहे आणि बरेच जण तिकडे सूर्यास्त पहिल्यासारखे पाहत असतात.
झोप हाच आमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे. झोप आणि मोबाईल या आयुष्यातल्या दोन सुंदर गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवणार आहोत की, त्यांना एकमेकांच्या प्रतिस्पर्धी बनवणार आहोत, ही आपली चॉइस आहे. मोबाईल हा सरसकट चांगलाच आहे असं म्हणणं किंवा मोबाईल हाच समस्यांचं मूळ आहे असं म्हणणं, या दोन्ही भूमिका टोकाच्या आहेत. मोबाइलमुळे जितक्या सोयी सुविधा निर्माण झाल्यात, तितकेच त्याचे साईड इफेक्ट्सही आपल्यावर नकळतपणे होत आहेत.
ज्या गोष्टींचा वापर होत नाही, तो गोष्ट लयाला जाते, हे आपल्याला माहीतच आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हिशोब करण्यासाठी आपण मेंदूचा वापर करायचो. फोन नंबर लक्षात ठेवणे, माहिती लक्षात ठेवणे यासारख्या कामांसाठी मेंदूचा उपयोग होत असे. परंतु आता मोबाइलमुळे यापैकी कुठल्याच कामासाठी मेंदूचा उपयोग करण्याची गरज राहिलेली नाही. मात्र त्यामुळे मेंदूच्या क्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी अशा क्षमता जिवंत राहतील आणि मेंदूचे वेगवेगळे फंक्शन्स वापरले जातील, याची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या शाळेत असलेल्या पिढीच्या पालकांच्यासमोर हे मोठं आव्हान आहे.
सध्या तिशीत किंवा चाळिशीत असलेल्या पिढीला घरी टीव्ही असण्याचं काहीच अप्रूप वाटत नाही. मात्र या पिढीच्या वडिलांना किंवा आजोबांना घरात टीव्ही येणं, हा आयुष्यात घडलेला मोठं बदल होता. तुम्ही बाळ असल्यापासून ज्या गोष्टी आयुष्यात येतात, त्यांच्याशी ‘कोप-आप’ करण्यासाठी वेगळा संघर्ष किंवा डायजेस्ट करावी लागत नाही.
मुलांना वाचनाचे वेड लावावे लागते. पुस्तकाचे एखादे पान फाटले तरी चालेल पण मुलांना पुस्तके हाताळू द्यावीत. पुस्तकांचा विशिष्ट सुगंध अनुभवू द्यावा अशी धारणा असणारे काही पालकही आढळतात. पण हातात पुस्तक घेऊन वाचले म्हणजेच वाचन केले ही व्याख्या काळाबरोबर बदलत आहे. अनेक मुले ऑनलाईन पुस्तके वाचू किंवा ऐकू लागली आहेत. मुलांना मोबाइलचे वेड असते. या वेडाचा वाचनासाठी सकारात्मक उपयोग पालकांना करून घेता येऊ शकेल. त्यामुळे मुलांच्या मनात पुस्तकांविषयी रूची आणि उत्सुकता निर्माण होऊ शकेल. त्यातून वाचनाकडे त्यांचा कलही वाढू शकेल. कोरोना काळात शाळा ऑनलाईन होत्या. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात सर्रास मोबाईल होते. ती त्यावेळची गरज असल्याने पालकांना बोलण्याची सोयच नव्हती.
कोरोना संपला आणि शाळा पूर्वीसारख्याच ऑफलाईन सुरू झाल्या. तरीही अडीच-तीन वर्षांची सवय लागलेल्या मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणे पालकांपुढे अनेक समस्यांचे कारण बनले. काही पालकांनी जबरदस्तीने मोबाईल काढून घेताच अनेक मुलांनी सरळ आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे तर काही ठिकाणी मुले घरातून निघून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांपुढे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी मुलांना मोबाईल ही गरज होती. आता, त्याची गरजच नसताना मुलांचा हट्ट कसा पुरवायचा? व यातून मार्ग कसा काढायचा असा जटिल प्रश्न उभा राहिला आहे.
इंटरनेटचा वापर वाढला असून मोबाइलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होत आहेत. मोबाइलने क्रांती केली हे जरी खरे असले, तरी घराघरांमधील संवाद मात्र याच मोबाइलमुळे कमी झाला आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती मोबाइलच्या या मोहजाळात अडकला असून, इंटरनेट शिवाय त्याचे जगणे मुश्किल झाल्याचे चित्रा आहे. इन्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, ओटीटी, व्हॉट्सअप हे वापरणार्‍यांची संख्या जास्त असल्याने शहरापासून गावगाड्यापर्यंत इंटरनेटचा देता हाच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. रिल्स पाहण्यापासून सगळीकडे इंटरनेट वापर वाढला आहे. मोबाईलचा अतिवापर हा थोरांपासून लहानग्यापर्यंत घातक ठरत आहे. त्याच्या अतिवापरामुळे मेंदू, मनावर ताण येतो. एकाग्रता कमी होते. सततच्या पाहण्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन निद्रानाश जडतो. भूक मंदावणे, स्मृति हरवणे, अनामिक भीती, एकलकोंडेपणा, नैराश्य वाढणे असे विविध प्रकार घडतात.
मोबाईलवरचे मनोरंजन आणि टीव्ही, सिनेमा, नाटक किंवा इतर कुठलंही मनोरंजन यात एक मूलभूत फरक आहे. टीव्ही कार्यक्रमाच्या वेळेवर तुमचा कंट्रोल नसतो. मात्र मोबाईलवर पूर्णपणे तुमचं कंट्रोल असतो. त्यामुळे कुठं थांबायचं, ही चॉइस तुमच्या हातात असते. इतर कार्यक्रम ठरलेल्या वेळेत संपतात, मात्र मोबाइलचं तसं होत नाही. आपण किती वेळ मोबाईल पाहत आहोत, याचं भान आपल्याला राहत नाही. आभासी जगातला सेन्स आणि प्रत्यक्षातला वेळेचा सेन्स यात फरक असतो. तुम्ही एक तास जेव्हा मोबाईल गेम खेळता, तेव्हा प्रत्यक्षात मात्र तुम्हाला १५ – २० मिनिटं खेळल्याचाचं फील येतो. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत हे जास्त होतं. तुम्ही एक तासापासून मोबाईलवर गेम खेळत आहात, हे त्यांना मान्य होत नाही. पालकांना मात्र मुलं खोटं बोलतात किंवा नाटक करतात, असं वाटतं. त्यामुळे वेळ ठरवून किंवा अगदी टायमर लावून मोबाईल गेम खेळायला देणं, हा त्यातल्या त्यात सोपा उपाय आहे. मोबाईल वापराची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन गोष्टी बिघडू लागल्या की मानसिक आरोग्य बिघडायला सुरुवात होते. झोपेचं नुकसान होणं, सोशल मिडीयावरून येणारी नकारात्मक्ता, इतरांच्या पोस्ट पाहून नकळत मनात निर्माण होणारी तुलना, स्पर्धा आणि असूया या गोष्टींचा मेंटल हेल्थवर दूरगामी परिणाम होत असतो. ऑनलाईन शॉपिंग ही एक मोठी सोय असली, तरी मुलांच्या सामाजिक जडणघडणीतला तो एक मोठा अडथळा असल्याच काही समाजशास्त्रज्ञ मानतात. एखादी वस्तु घ्यायची असेल, तर घराबाहेर पडणं, बाजारात फिरणं, चार – पाच दुकानात फेरफटका मारणं, त्या निमित्ताने भेटणारी माणसं, माणसांशी होणारे फेस-टू-फेस संवाद या सगळ्याचा मुलांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.
सर्वसामान्यांना हल्ली मोबाईल विकत घेणं परवडू लागलं आहे. अगदी ५-७ हजारापासून स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गापासून सगळेच मोबाईल विकत घेऊ शकतात. या वर्गाला न परवडणारी गोष्ट आहे टी म्हणजे मोबाईल नसणं किंवा मोबाईलपासून दूर राहणं. ‘मोबाईल डिटॉक्स’ ही सध्या तरी श्रीमंतांचीच मक्तेदारी झाली आहे. गरीबांना किंवा मध्यमवर्गीयांना मोबाईल शिवाय ‘राहणं’ ही बाब आता परवडणारी राहिली नाही.
मोबाइलला जास्तीत जास्त काळ स्वत:पासून दूर ठेवणे हीच काळजी घेतली पाहिजे. इंटरनेट थोड्या – थोड्या वेळासाठी बंद ठेवण्याची सवय करा, रात्री फोन अजिबात वापरू नका, यामुळे डोळ्यावर खूप ताण पडतो, फोन शक्यतो सायलेंटवर ठेवून एखादे पुस्तक वाचणे, चित्रपट, खेळ, रेसिपी अशा आवडी जपू शकता. मोबाइलच्या अतिवापरामुळे मेंदूसह आरोग्याच्या सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दिवसातून किती वेळ मोबाइल पाहायचा, त्याचा किती वापर करायचा हे ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच वाचनवेडे बनवण्यासाठी साप्ताहिक आणि उन्हाळ्याची सुट्टी उपयोगात आणता येईल.
ग्रंथालय आपल्या दारी। ज्ञानगंगा पोहचली घरोघरी’ या उपक्रमांतर्गत जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती या शतकोत्तर शैक्षणिक परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रंथालय / वाचनालय आपल्या दारी हा अभिनव उपक्रम शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक भान असलेला उद्योजक अर्थात समाजभानी उद्योजक आणि धरणगुत्ती गावचे सुपुत्र डॉ. सुनील दादा पाटील यांची 30 ते 40 हजार पुस्तकांची समृद्ध अशी वैयक्तिक लायब्ररी यासाठी सज्ज झाली आहे. डॉ. सुनील दादा पाटील यांच्या या वैयक्तिक लायब्ररीमधून प्रत्येक शनिवारी मुलांना आवडी – निवडीनुसार पुस्तके वाटप करण्यात येत आहेत. पुस्तक वाचून झाल्यानंतर आपला अभिप्राय विद्यार्थी नोंद करणार आहेत. विद्यार्थ्यांना एक लायब्ररी कार्ड देण्यात आले आहे. अधिकाधिक पुस्तके वाचणार्‍या मुलांचा सन्मान करण्यात येणार आहे. टी. व्ही. आणि मोबाइलच्या युगात वाचनसंस्कृती दुर्लक्षित होत आहे. अशा वेळी जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती या जिल्हा परिषदेच्या शाळेत वाचनसंस्कृती, वाचन चळवळ खोलवर रूजावी म्हणून ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम राबवून अधिकाधिक वाचनीय आणि संस्कारक्षम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
आजच्या काळात टीव्हीवरील मालिका माणसाला जमिनीवर राहू न देता वेगळ्या जगत घेऊन जाण्याचे काम करत आहेत. व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियामुळे मानवी भावना बोथट होत चालल्या आहेत. एकप्रकारे संवेदनाहीन पिढीचे लोंढे बाहेर पडत चालले आहेत. या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल तर सद्य: स्थितीत्त प्रत्येक आई, मम्मी आणि मॉमने मातृत्वाचा दीप तेवत ठेवायला हवा.
पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षणामुळे संस्कृती आणि संस्कार बिघडत चालले आहेत. त्यामुळे मूल्याधारित शिक्षणाची गरज अधोरेखित झाली असून, संस्कारशील मुले घडवण्याची जबाबदारी जशी शिक्षकांची आहे, तशी पालकांचीही आहे. मात्र शिक्षकांची मुख्य जबाबदारी पिढी घडवण्याची आहे. विद्यार्थी कसे घडतील, यासाठी आव्हाने पेलत नवनवीन प्रयोग करून अधिक योगदान देणे आवश्यक आहे.
आजची जी सर्वच मोठी माणसे आहेत त्यांनी आपल्या लहानपणी चांदोबा, किशोर, बालकुमार, छावा, अमृत, मुलांचे मासिक, चंपक, कुमार, नॉलेज यासारखी बालमासिके नक्कीच वाचलेली आहेत. या बालमासिकांनी काही पिढ्या घडवल्या आहेत. बालमासिकांचे महत्त्व लक्षात घेऊन सदर उपक्रमात अनेक बालमासिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला असून. अनेक दुर्मिळ मासिके किंवा काही अपरिहार्य कारणास्तव बंद पडलेल्या अनेक बालमासिकांचा मोठा संग्रह विद्यार्थ्यासाठी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आला आहे. खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विशेषांक आणि उन्हाळी सुट्टी विशेषांक यांचा विपुल संग्रहसुद्धा मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आयुष्य सुंदर आहे फक्त जगता आले पाहिजे. सद्यस्थितीत आपण आभासी जीवनात जगत असून सुख, समाधानी, शांती, नाती – गोटी यासारख्या गोष्टी हरवत चालल्या आहेत. यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होऊन सुंदर आणि शाश्वत जगण्याचं मर्म ओळखून जगायचा प्रयत्न केला, तरच खर्‍या अर्थाने आपलं जगणं आनंदाचे होईल. वाचन करताना मन पूर्ण समर्पित असेल तरच आत्मिक समाधान मिळते. एखादा सामान्य जीवही ज्ञानाग्नीच्या ठिकाणी पूर्ण समर्पित झालेला असतो तेव्हाच त्याचे पूर्ण जीवन तेजोमय होऊन जाते. ज्ञान नव्हे, तर सर्जनशीलता, कल्पकता हे बुद्धिमत्तेचे खरे लक्षण होय.
शांततापूर्ण अभ्यासाचे दोन तास:
मोबाईल, दूरचित्रवाणी (टी. व्ही.) अनियंत्रित वापर, विद्यार्थी अवधान आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये अडथळा ठरणारा आहे. त्यामुळे मौजे धरणगुत्ती या गावात रोज सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत टी. व्ही. आणि मोबाइल बंद ठेवून विद्यार्थ्यांचा गृहपाठ, स्वाध्याय वेळेत पूर्ण करण्याचा उपक्रम अर्थात ‘शांततापूर्ण अभ्यासाचे दोन तास’ असा अनोखा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जात असून सदर संकल्पनेला मोठ्या प्रमाणात पालकांच्या कडून पाठिंबा मिळत आहे. गावकर्‍यांचा सक्रिय सहभाग ही एक अत्यंत आनंददायी बाब आहे. मोबाईल, टी. व्ही. इत्यादींचा वापर बंद करून विद्यार्थ्यांसाठी अध्ययन पूरक आणि शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून द्यावे म्हणून आवाहन केले होते; त्याला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मौजे धरणगुत्ती येथे विद्यार्थ्यांचे गृहपाठ, स्वाध्याय नियोजनपूर्वक, वेळेत पूर्ण करण्याचा उपक्रम यशस्वीपणे वाटचाल करत आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात आम्ही आमचा मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्यापासून सुरुवात केली असून आमचा मुलगा संपूर्णपणे मोबाईलपासून दूर आहे; तसेच दूरचित्रवाणी (टी. व्ही.) आमच्या घरी नाही. त्यामुळे आमचा संपूर्ण परिवार दूरचित्रवाणी (टी. व्ही.) पासून संपूर्णपणे दूर आहे. आजच्या जमान्यात टी. व्ही. नाही असे कोणतेच घर नाही. अगदी वाड्या – वस्त्या – झोपडपट्ट्या आणि रस्त्याकडेच्या पालातसुद्धा दूरचित्रवाणी (टी. व्ही.) पोहचलेला आहे आणि त्या घरातील मुले आणि महिला तासन्तास टी. व्ही. समोर असतात. मात्र मला याचा सार्थ अभिमान आहे की, टी. व्ही. नसलेल्या मोजक्याच आणि अत्यंत दुर्मिळ घरांच्या यादीत आमचे नाव प्राधान्य क्रमाने आहे.
सध्याच्या सेट टॉप बॉक्स व केबलच्या युगात वाहिन्यांवर दररोज शेकडो मालिका दाखविल्या जातात; मात्र या मालिका संस्कारक्षम नसतात. या मालिकांमधून स्त्रियांवरील अन्याय, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, व्यसन, कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांवरील द्वेष, त्यातून रचले जाणारी कट कारस्थाने, कौटुंबिक भांडणे अशा प्रकारची दृश्ये दाखवली जातात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर, कुटुंबातील लहान मुलांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. काही – काही मालिका समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचे आणि तेढ निर्माण करण्याचे काम करतात. एकीकडे शाळेत मुलांवर वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवले जात असताना या मालिका अंधश्रद्धेचा प्रसार करताना दिसत आहेत. खरे तर, सरकारने अशा अंधश्रद्धा पसरविणार्‍या मालिकांवर बंदीच घालायला हवी.
उन्हाळी सुट्टीत प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजवणे काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या जिल्हा परिषदेच्या शाळेतील आणि परिसरातील अन्य शाळांतील विद्यार्थ्यांचा सुट्टीला वेळ सार्थकी लागावा म्हणून डॉ. सुनील दादा पाटील आणि परिवाराने ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला त्यात मामाच्या गावी ‘धरणगुत्ती’ येथे सुट्टीसाठी आलेल्या अनेक पाहुण्या मुला – मुलींचादेखील समावेश आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित करण्यात आलेले ‘बालवाचन संस्कार शिबिर’ आणि संपूर्ण वर्षभरातील अन्य वाचन प्रकल्प यात सक्रिय सहभाग घेतलेल्या उत्कृष्ट वाचकांना विशेष पुरस्कार दिले जातात.  अधिकाधिक पुस्तके वाचणार्‍या मुलांचा या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात येतो तसेच अन्य मुलांना वाचण्यासाठी कशी प्रेरणा मिळेल यासाठी त्यांना वेळोवेळी प्रेरित केले जाते. शालेय जीवनात मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांना अतिशय घातक ठरत असून; सर्वच पालकांनी मोबाईलपासून आपल्या मुलांना दूर ठेवावे असे आवाहन करण्यात आले.
पंचायत समिती शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, केंद्र प्रमुख आण्णा मुंडे यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
‘ग्रंथालय आपल्या दारी। ज्ञानगंगा पोहचली घरोघरी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या अधिक महितीसाठी आणि सदर तसेच अन्य लोकोपयोगी उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर, धरणगुत्ती’ या शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय सूर्यवंशी – 9922772814 किंवा ‘कवितासागर पोस्टल लायब्ररी फॉर स्कूल्स’ या उपक्रमाचे प्रवर्तक / मुख्य संयोजक आणि शाळा शिक्षण समितीचे सदस्य डॉ. सुनील दादा पाटील – 9975873569 यांच्याशी संपर्क साधू शकता.
Back to top button