मराठी

महापारेषणमध्ये होणार 8500 पदांवर भरती

लॉकडाऊनमध्ये तरुणांसाठी संधी!

मुंबई/दि.२३ – राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
मंत्री डॉ राऊत यांच्या सुचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. आज मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पद भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत.
मुंबईत वीज ठप्प होऊ नये म्हणून उरण येथे उभारणार हजार मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प
यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 साली महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची सांख्य वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने कोरोना काळात राज्यात सरकारी नोकरीची संधी हजारो तरुणास उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Back to top button