मराठी

२८ मे मासिक पाळी स्वच्छता दिवस.

आजच्या दिवशी लेखक शिवाजी सावंत यांचं एक वाक्य आठवत, ” पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू जाणते..! ”

वरील वाक्यात म्हटल्याप्रमाणे, कुठल्याही स्त्रीची हाच मातृत्वाचा पराक्रम गाजवण्याची सुरवात एका सुंदर प्रक्रियेतून होते ती प्रक्रिया म्हणजेच तिला येणारी मासिक पाळी !
    परंतु स्त्रीची हीच मासिक पाळी आपल्या समाजात अपवित्र समजल्या जाते. आपण स्वतः ला विचारांनी कितीही पुरस्कृत समजत असलो तरही समाजातील एक वर्ग धार्मिकतेच्या नावाखाली, देवानेच स्त्रीला प्रदान केलेल्या या सुंदर प्रक्रियेला अपवित्रतेचा टॅग लावून मोकळा होतो. एवढेच काय तर सध्याच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या आपल्या समाजात मासिक पाळीच्या संदर्भात उघडपणे बोलल्या जात नाही. स्त्रिया स्वतः देखील कितीतरी वेळेस या विषयावर बोलण्याच टाळाटाळ करतात. ग्रामीण भागात मासिक पाळी या प्रक्रिये बद्दल खूप वेगवेगळे गैरसमज अजूनही दिसून येतात. आणि त्यामु्ळे अनेक मुलींना, महिलांना मासिक पाळीच्या पाच दिवसांत विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच अतिशय निकृष्ट दर्जाची वागणूक त्यांना दिली जात आहे. कारण मासिक पाळीला निसर्गिक प्रक्रिया म्हणून बघण्याची दृष्टी आपल्या समाजात आलेली नाही. या संदर्भात अजूनही आपला समाज जागृत नाही. समाजाने आज खरंच या विषयावर जागृत राहून विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे .
  ” हे अफाट विश्व निर्माण करण्याची शक्ती फक्त एका स्त्रीतचं आहे, मग एका स्त्रीला येणारी मासिक पाळी अपवित्र कशी ?? म्हणूनच तिचा सन्मान हाच आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा सन्मान असेल. “
पाळी येणं ही स्त्रीच्या आयुष्यातील अमूल्य अभिव्यक्ती आहे. प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरु होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्या अगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते. गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वता !! म्हणजेच मासिक पाळी. गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला ५ दिवस ही क्रिया घडते जिला आपण मासिक पाळी म्हणतो.
     त्या ५ दिवसात होणाऱ्या असह्य वेदना एक स्त्री सहन करत असते. कारण हाच वेदनादायी त्रास पुढे तिला, तीच मातृत्व बहाल करणार असतो. स्त्रीला आई होण्याची ओढ निसर्गाच्या कडूनच मिळली आहे. आई होण्याचं सुख हे स्त्री जीवनातील सर्वोच्च सुख मानलं जातं. आई होण्यासाठी मासिक पाळी येणं महत्त्वाचं असतं. परंतू त्या ५ दिवसात तिला वेगळेपणा दिला जातो. काही अंधश्रद्धाळू नियमांच्या चौकटीत बसवलं जात. देव ही संकल्पना जर सर्वव्यापी असेल तर त्या पाच दिवसात त्याला महिलांचा स्पर्श कसा टाळता येऊ शकतो?? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
    कितीतरी स्त्रीया वेळप्रसंगी धार्मिक, आध्यात्मिक, सणवार अश्या अनेक करणामुळे पाळी पुढे ढकलण्याचा गोळ्या, औषधे घेतात. परिणामी त्याचा त्यांच्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होतात. पूर्वजांचे एक ठाम मत होते की या मासिक पाळीच्या काळात मुलीला किंवा महिलेला अनेक शारीरिक, मानसिक चढ उतारांचा सामना करावा लागतो. तिच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. म्हणून या काळात तिने पूर्णतः आराम करणे हे तिच्या मानसिक आणि प्रजननीय आरोग्यासाठी अति महत्वाचे आहे. परंतु याचाच अर्थ पुढील पिढींनी अपवित्र असा घेतला. आणि मासिक पाळी प्रक्रियेला अपवित्र ठरवले. परंतु अंधश्रद्धाळू वृत्ती न जोपासता, वैज्ञानिक दृष्टीकोनातून या नैसर्गिक प्रक्रियेचा स्वीकार करायला हवा. एक नाजूक कळी पासून सुंदर फुल तयार होण्या पर्यंतची ही एक सुंदर प्रक्रिया आहे. त्याच प्रमाणे एका स्त्रीच्या आयुष्यात सुध्धा, लहान मुलीपासून एक स्त्री होण्याची तिची पहिली पायरी म्हणजे मासिक पाळी. म्हणून या प्रक्रियेत आपणही एका स्त्रीला तितक्याच प्रेमळतेने हाताळले पाहिजे, मानसिक तसेच भावनिक आधार दिला पाहिजे.आणि कुठलीही अंधश्रद्धाळू वृत्ती न बाळगता पाळी ह्या निसर्गिक प्रक्रियेचा सन्मान केला पाहिजे.
     आजवर आपण मासिक पाळी ही प्रक्रिया अपवित्र,अशुद्ध यासर्व गर्तेत असल्या कारणाने, मुळात या विषयावर जनजागृती करण्यात, चर्चा करण्यात, यासंबंधीचे स्त्रीयांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास आपला देश माघे राहिला आहे, असं म्हणायला हरकत नाही. आजही मोठ्या प्रमाणावर महिलांकडून सॅनेटरी पॅड वापरल्या जात नाहीत. फक्त ३६ % स्त्रीया सॅनिटरी पॅड वापरतात. सॅनिटरी पॅड दराने महागडे असल्याने विकत घेणे शक्य नसल्यामुळे गरीब वर्गातील अनेक मुली व महिलांना पाळीच्या पाळीच्या पाच दिवसात कपड्यांचा वापर करावा लागतो. त्यातून विविध प्रकारच्या रोगांना त्यांना सामोरे जावे लागते. ही खूप गंभीर समस्या आहे.त्यामुळे सरकारने सॅनिटरी पॅड अगदी माफक स्वस्त दरात तसेच मोफत उपलब्ध करून द्यायला हवेत.
       यासंदर्भात पुढाकार घेणार, महिलांना ‘सॅनिटरी पॅड्स’ मोफत उपलब्ध करून देणारा ” स्कॉटलंड ” हा पहिला देश ठरला आहे. स्कॉटिश संसदेने याबाबतचा कायदा एकमताने मंजूर केला. मासिक पाळी आरोग्य उत्पादने (मोफत उपलब्धता) कायदा मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार आता स्थानिक अधिकाऱ्यांना महिलांची मासिक पाळी आरोग्य उत्पादने मोफत उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच सामाजिक केंद्रे, युवा गट, औषध दुकाने या ठिकाणी ही उत्पादने मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. तर त्यासाठी 2022 पर्यंत 8.7 दशलक्ष पौंडाचा खर्च येणार आहे. ही उत्पादने शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात उपलब्ध केली जातात, असे या विधेयकात प्रमुख भूमिका पार पाडणाऱ्या मोनिका लेनॉन यांनी माहिती दिली आहे.
      म्हणून यापुढे कुठलेही दुमत न ठेवता, सृष्टि कडून स्त्री-जातीला मिळालेल्या या नैसर्गिक प्रक्रियेचा निसंकोचपणे स्वीकार करूयात. अंधश्रद्धाळू विचारांच्या शृंखला तोडूयात. आणि मासिक पाळी या सुंदर नैसर्गिक प्रक्रियेचा स्वीकार करूयात.
       – श्रद्धा शंकरराव चौखंडे✍️

Related Articles

Back to top button